शिमगोत्सवाची धामधूम १३ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. कोकणकन्या, जनशताब्दी, मांडवी, तुतारी एक्स्प्रेससाठी चाकरमानी प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या नजरा होळी स्पेशलकडे खिळल्या आहेत. गणेशोत्सवापाठोपाठ शिमगोत्सवातही ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. नियमित गाड्यांसह हिवाळी स्पेशलचे आरक्षण खुले होताच काही मिनिटातच सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल होत असल्याने चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे. रेल्वेकडून होळी स्पेशल पाठोपाठ रेल्वेगाड्यांना अतिरिक्त डबे जोडून चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करते.
तरीही शिमगोत्सवात विक्रमी गर्दीने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे चाकरमान्यांना खासगी वाहनांचा आधार घेत गाव गाठावे लागते. यंदाही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शिमगोत्सवातील नियमित गाड्यांचे आरक्षण ७ जानेवारीपासून खुले झाले आहे. आरक्षण खुले होताचे आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर एकच झुंबड उडाली. १३ व १४ मार्चला धावणाऱ्या कोकणकन्या, जनशताब्दी, मांडवी, तुतारी एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल झाले आहेत. शिमगोत्सवातील अन्य गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी वेटिंगवर आहेत.