गौरी-गणपतीसाठी तालुक्यात हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या कोकणवासी गणेशभक्तांनी आज रात्रीपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मंडणगड बसस्थानक मुंबईकरांनी गजबजून गेले आहे. सकाळी सुटणाऱ्या गाड्या विलंबाने धावल्याने काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला. पाच दिवसांचे गौरी-गणपतींचे विसर्जन केल्यानंतर सुट्या संपल्या असल्याने काल लगेच अनेक कोकणवासीयांनी परतीचा प्रवास सुरू केला. खासगी व महामंडळाच्या गाड्यांचा यासाठी वापर केला. परतीच्या प्रवासात नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता मुंबई, नालासोपारा, ठाणे, बोरिवली या मार्गावर मंडणगड आगाराच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी ५८ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. ४ ला २५ जादा बसेस सोडल्या आहेत तसेच २ ते ७ सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत मंडणगड आगाराच्या वतीने १२०हून अधिक जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक मदनीपाशा जुनैदी यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाकरिता तालुक्यात दाखल झालेल्या गणेशभक्तांनी यंदा प्रवासाकरिता महामंडळाचे एसटी बसेसबरोबरच खासगी गाड्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. याचबरोबर परळ, नालासोपारा, ठाणे या मुंबईतील आगाराच्या गाड्यांचा थेट गावी जाण्यासाठी वापर केल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाकरिता तालुक्यात आलेल्या कोकणवासी गणेशभक्तांनी स्थानिक बाजारपेठेत पूजासाहित्य, सजावट व रंगरंगोटी सामान, फळे, फुले व जीवनावश्यक किराणा सामान खरेदीकरिता मोठी गर्दी केल्याचे दिसून आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.
पावसामुळे उडतेय तारांबळ – ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढल्यामुळे गणेशभक्तांना नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली. परतीच्या प्रवासात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे गावाहून बसस्थानकापर्यंत ये-जा करताना तारांबळ उडत आहे.