25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriगुंडशाहीला कोकण चूड लावणार - उद्धव ठाकरे

गुंडशाहीला कोकण चूड लावणार – उद्धव ठाकरे

इथे उमेदवार नव्हते, म्हणून येथून गद्दार उमेदवारी दिली.

आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो; परंतु ही ठाकरेंची परंपरा आहे; पण रत्नागिरीतील दोन भाऊ, सिंधुदुर्गात दोन भाऊ आणि वडील ही घराणेशाही नाही का, हे कोकणाला खायला बसले आहेत. कोकण हा नेहमी गुणग्राहकता जपणारा आहे. कोकणी बांधव शांत राहतो; पण त्याला जे करायचे ते बरोबर करून दाखवतो. मला खात्री आहे, इथली घराणेशाही नव्हे, तर गुंडशाहीला कोकणी माणूस चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब माने यांच्या प्रचारासाठी येथील जलतरण तलावाजवळील मैदानात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी मिलिंद नार्वेकर, बाळ माने, माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री रवींद्र माने, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे उमेदवार प्रशांत यादव, राजापूरचे उमेदवार राजन साळवी, शिवसेना नेते राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे, बशीर मुर्तुझा आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आता आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. अनेक जणांनी धुमाकूळ घातला आहे. कितीही पैसेवाला उतरला तरी काही उपयोग होणार नाही. महाराष्ट्र कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही. एका गोष्टीचा मला अभिमान आहे, की कोकणाने चांगले आशीर्वाद दिले आहेत. आता तिकडेसुद्धा मी जाणारच आहे. कोल्हापूरला गेलो होतो, सर्व परिसर गर्दीन गच्च होता. महाराष्ट्रात मशाल पेटली आहे. ही मशाल खोकेबाज राजकारण भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. कोकण कोणाचे आहे, गुंडांचे की लोकशाही मानणाऱ्याचे हे ठरवण्याची वेळ आली आहे. पैशांचा माज आलेल्या आणि गुर्मीत चालणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे. युती होती ते दिवस खरोखरच सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखे होते. तेव्हा एकत्र सर्व निवडणुका लढल्या; परंतु भाजपला काय अवदसा सुचली आणि शिवसेनेला बाजूला सारले. भाजप आणि आमच्यात ३६ चा आकडा निर्माण झाला. तेव्हा इथे उमेदवार नव्हते, म्हणून येथून गद्दार उमेदवारी दिली. तुमच्या मानेवर भूत बसवले. बाळ माने आता तुम्हाला हे मानेवर बसवलेले भूत उतरवायचे आहे.

ठाकरे म्हणजे शब्दाचे पक्के तेव्हा मंत्रिपद देतो, असे बोललो होतो. आता सत्ता आली, उद्योगमंत्री केले; परंतु ते निरोद्योग मंत्री ठरले. त्यांनी एकही उद्योग आणला नाही.” ते म्हणाले, “महाराष्ट्र हा निष्ठावंतांचा आहे. राजन साळवी कायम निष्ठावंत शिवसैनिक राहिला. तो फुटला नाही, म्हणून त्याच्या घरावर छापे टाकले. तरी खचून जाऊन लाच घेऊन सुरतेला ते पळाले नाहीत. आम्ही मर्द मावळे आहोत. सिंधुदुर्ग येथील शिवरायांचा पुतळा पडला. तुम्हाला लाज वाटली, म्हणून महाराष्ट्रात येऊन माफी मागितली. हा महाराष्ट्र तुम्हाला पुसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला आमचे राज्य आल्यास सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार. सुरतला देखील उभारणार म्हणजे पळून जाणाऱ्यांना किमान लाज वाटेल. मुलांना मोफत शिक्षण देणार, पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र महिला पोलिस ठाणी उभारणार. तुम्हाला देवा भाऊ, दाढीवाला भाऊ आणि जॅकेटवाल्या भाऊंनी काय दिले.”

प्रत्येक भाषणात कोरोना काळात मी घरी बसलो, असे आरोप केले जात आहेत. अरे हो बसलो घरी; पण घरी बसून लोकांची घरं सांभाळली. तुमच्यासारखी घर फोडणारी आमची औलाद नाही, असे ठाकरी भाषेत ठणकावले. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर बोलताना ठाकरे म्हणाले, न्यायदेवतेला माझी विनंती आहे. ८ तारखेला सुनावणी होऊन त्यावर निर्णय द्यावा; परंतु सुनावणीची बतावणी होऊ नये. कारण शिवसेना हा माझा पक्ष आहे आणि माझाच राहणार, असे ठाकरे म्हणाले.

भाजपला लागलाय दाढीवाला खोडकिडा – भाजप आणि संघाच्या लोकांना मी सांगू इच्छितो, ज्यांनी भाजप रुजविला त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडताय. तुम्हाला हा भाजप मान्य आहे का, अडवानी, अटलजी, महाजन यांचा भाजप गेला कुठे. त्यांच्या स्वप्नाला लागलेला दाढीवाला खोडकिडा तुम्ही स्वीकारणार का, असा सवाल ठाकरे यांनी रत्नागिरीतील भाजपला केला.

RELATED ARTICLES

Most Popular