गेली अनेक वर्षे रखडलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आमचे सरकार आल्यावर वर्षभरातच सुरू झाले, हेच आमचे गतिमान सरकार आहे. कोकणी माणसाला राजकारणापुरते वापरून घेणार कता नाही. लोकांच्या दारात जाऊन योजना वाटणारे आमचे सरकार आहे, घरी बसणारे नव्हे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण आणि नमो ११ सूत्री कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्या सरकारची सर्वसामान्यांशी नाळ जोडलेली आहे. आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही. तळागाळातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन आरोग्य योजनेत आमूलाग्र बदल करणार आहोत. कोरोनातील अनुभव लक्षात घेऊन आरोग्यक्षेत्रात कायापालटचा निर्धार केला आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्ही १६० कोटी खर्च केले. सामान्य लोकांसाठी केलेल्या खर्चामुळे अनेक लोकांना पोटदुखी झाली आहे. रत्नागिरीत ४३० खाटांचे हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी ५०० कोटी मंजूर केले आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या होस्टेलच्या अडचणी दूर करू. लवकरच सरकारी हॉस्पिटलमध्येही कॅशलेस सेवा सुरू केली जाणार आहे.ते म्हणाले, ‘राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील ४०० ठिकाणी झाली आहे. आम्ही आरोग्य विभागावर फोकस केला आहे.
औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम ५ लाखांवर वाढविली आहे. योजना वाटणारं, योजना देणारं सरकार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.’ कोकण विकासासाठी मुंबई- गोवा-सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता तयार करणार. कोकण विकास प्राधिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काजू बोर्डाला २०० कोटी दिले. आंबा बोर्ड स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे ते म्हणाले.
रत्नागिरीतील विमानतळाला ११८ कोटी मंजूर केले आहेत. येथे नाईट लँडिंग सुरू होणार आहे. नमो ११ सूत्री कार्यक्रमात अनेकांना मदत केली जाणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नमो ११ सूत्री कार्यक्रमातून शासनाच्या योजनांचा थेट फायदा लाभार्थ्यांना होणार आहे. अवकाळी पावसामुळे, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकार लवकरच मदत देणार आहे. महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ, विनय नातू, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.