कोयना प्रकल्पातील सर्जवेलची गळती नवीन वर्षात काढली जाणार आहे. गळती काढण्यापूर्वी टप्पा १ आणि २ बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात वीजनिर्मितीत ६०० मेगावॉटची घट होणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ऊर्जा विभागाकडे कोयनेच्या चौथ्या टप्प्याचा पर्याय आहे. चौथ्या टप्प्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करता आली, तर वीज निर्मितीत होणारी घट भरून काढणे शक्य आहे. कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याची गळती काढण्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. नवीन वर्षात हे काम सुरू होण्याची शक्यता आहे. गळती काढण्यापूर्वी प्रकल्प बंद ठेवावा लागणार असल्यामुळे ६०० मेगावॉट वीजनिर्मिती कमी होणार आहे.
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार निघते. या बोगद्याच्या शेवटी एक सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. या विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॅाल्व्ह टनेल म्हणजे आपत्कालीन झडपेद्वारे भुयारमध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते. या पाण्यामुळे वीजगृहाला जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नसला तरी गेली पाच वर्षे ही गळती सुरू आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दिवसेंदिवस ही गळती वाढत असल्यामुळे सर्जवेलची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. गळती काढण्यासाठी सर्जवेल पूर्णपणे कोरडी केली जाणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील.
त्यानंतर काँक्रिटीकरण करणे व ते मजबूत होण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान पहिल्या टप्प्यातून होणारी वीजनिर्मिती पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे. कोयना प्रकल्पाचे एकूण चार टप्पे आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून पोफळी येथे जलविद्युत केंद्राची उभारणी केली आहे. ७० मेगावॉटचे चार आणि ८० मेगावॉटचे चार अशा तऱ्हेने एकूण आठ विद्युतनिर्मिती संच येथे कार्यान्वित आहेत. या दोन्ही टप्प्यातून एकूण ६०० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. कोयना धरणात दुसरे लेक टॅपिंग करून चौथ्या टप्प्यासाठी स्वतंत्र मार्गाने धरणातील पाणी वळविण्यात आले आहे. त्यामुळे चौथा टप्पा चालू ठेवून पाण्याचा योग्य वापर करून वीजनिर्मिती करणे शक्य आहे.