महामार्गावरील लहान मोठ्या वाहनांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरु झाल्याने रस्त्याच्या कडेला कलिंगड विकणारे विक्रेते दिसू लागले आहेत. उन्हाळ्यात उष्णतेचा चटका चांगलाच बसायला सुरुवात झाल्याने, गारवा लाभण्यासाठी म्हणून अनेक वाहनचालक कलिंगड विक्रेत्यांच्या बाजूला गाडी लावून कलिंगडाचा आस्वाद घेताना दिसतात. त्याचप्रमाणे काही जण विविध प्रकारच्या ज्यूसचा सुद्धा स्टॉल लावलेलं दृष्टीस पडतात.
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील सुशांत राजन नेरुरकर हे कार घेऊन कुडाळ ते सावंतवाडीच्या दिशेने जात होते त्यांच्यासोबत शार्दुल सुरेश पाटकर वय २५ हे देखील होते. महामार्गावरील बिबवणे येथे कार आल्यानंतर सुशांत नेरुरकर यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार महामार्गालगत असलेल्या कुबल यांच्या कलिंगड विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली आणि पलटी झाली.
मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे येथे हायवेलगत असलेल्या कलिंगड विक्री स्टॉलमध्ये कार घुसून पलटी होऊन झालेल्या अपघातांमध्ये दोघेजण जखमी असून यातील सुशांत नेरूरकर हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. तर शार्दुल पाटकर याला कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
महामार्गावर वाहन चालवताना वेगाचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे. वेगावर नियंत्रण असणे अतिशय गरजेचे आहे. महामार्गावर सर्वच वाऱ्याच्या वेगाने जात असतात. त्यामुळे, अशा अपघातामध्ये एकतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वाहनाचे नुकसान होते ते वेगळेच आणि समोरच्या व्यक्ती किंवा वस्तूचे आर्थिक नुकसान सुद्धा होते. या अपघातामध्ये कलिंगड विक्री स्टॉलचे आणि विक्रीसाठी आणलेल्या मालाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.