कुडाळ येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकी दरम्यान शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. घडले असे कि, नगरपंचायतीकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केला असताना सेना आम वैभव नाईक यांनी त्याठिकाणी आपली गाडी घुसवल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ती रोखली. या प्रकारावरून शिवसेना-भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादीचा प्रसंग निर्माण होऊन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दरम्यान वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे प्रकरण शांत झाले.
नगरपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यावर, त्या ठिकाणी महाविकास आघाडीची वर्णी लागली. नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांना घेऊन आ. नाईक यांनी बंद असलेल्या मार्गात आपली गाडी घातली. यावेळी संतप्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाईक यांची गाडी तिथेच थांबवत, तुम्हाला इथे नो एन्ट्रीमध्ये गाडी घालण्यास कोणी परवानगी दिली ? असा थेट सवाल केला.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीदरम्यान नगरपंचायत कार्यालयाजवळ शिवसेना- काँग्रेस तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमवून, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, आनंद शिरवलकर, आबा धडाम यांच्यासह अन्य ४० ते ५० पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार स्वप्नील तांबे यांनी पोलिस ठाण्यात दिली. तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेविका सौ.अक्षता खटावकर, सौ.सई काळप, सौ.श्रृती वर्दम, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रेया गवंडे, उदय मांजरेकर यांच्यावरही कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.