चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटात कारवरील ताबा सुटल्याने सुमारे दोनशे फुट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात चिपळूणातील सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे जागीच ठार झाले तर त्यांच्याबरोबर असलेली महिला प्रवासी देखील गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारी १२. ४५ वा. सुमारास कुंभार्ली घाटात हा अपघात घडला. भिसे यांचा अचानक कारवरील ताबा सुटल्याने, त्यांची कार सुमारे दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आणि त्यामध्ये ते जागीच गतप्राण झाले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण विभागात शाखा सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे दीर्घकाळ कार्यरत होते. काही वर्षापूर्वी त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली अमरावती येथे झाली होती. त्यानंतर तेथून कराड येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात ते कार्यरत होते. यंदा मे अखेर ते सेवानिवृत्त झाले. सकाळी ते चिपळूणकडे जात असताना कुंभार्ली घाटात त्यांच्या कारला झालेल्या अपघातामध्ये ते आणि त्यांची सहकारी प्रवासी सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली. त्यांच्यासोबत असलेली महिला अश्विनी दिग्विजय रासकर वय ३२, रा. सातारा गंभीर जखमी झाली.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी व पोफळीतील ग्रामस्थ मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला तसेच भिसे यांचा मृतदेह बाहेर काढला. जखमी महिलेला कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर भिसे यांचा मृतदेह शिरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात शवविच्छेदणासाठी नेण्यात आला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चिपळूण पंचायत समितीचे कर्मचारी शिरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात पोहचले. भिसे यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व पत्नी असा मोठा परिवार आहे.