केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कुर्धे नळ पाणी योजनेचे काम करणारा ठेकेदार पैसे न दिल्यामुळे पसार झाला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे पाणी योजनेचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हर घर जल पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कुर्धे गावातील खोताची वाडी, बंडबेवाडी व कातळसडा परिसरासाठी पाणी योजनेच्या कामासाठी सव्वा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर पहिल्या वर्षी खांबतळे येथे दोन विंधन विहिरी मारण्यात आल्या. त्याला चांगल्याप्रकारे पाणी सापडल्यामुळे योजनेचा मुहूर्त झाला. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये या परिसरातील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करून कातळ परिसरामध्ये प्रत्येक घरात नळ पाणीयोजना देण्यासाठी खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली. पाणी योजना २०२४ पर्यंत पूर्ण करायची होती. दुसऱ्या वर्षात चांगल्या तन्हेने काम पूर्णत्वास गेले; परंतु त्यानंतर ठेकेदाराला कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे तो काम अर्धवट टाकून पसार झाला.
यामध्ये फक्त विंधन विहिरीला पाईपलाईन जोडणे व टाकीत पाणी येण्यासाठी पाईपलाईन जोडणे एवढीच कामे शिल्लक होती. ती पूर्णत्वास गेली नाहीत. त्यानंतर अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले. ते अर्धवट स्थितीत सोडून दिल्यामुळे कातळ परिसरामध्ये अनेक ठिकाणी परिसर धोकादायक बनला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे संपर्क केला असता कामाच्या ठेकेदाराला काम अर्धवट का ठेवले याबाबत विचारणा केली असता त्याचे उत्तर देण्यासाठी बोलावण्यात आले. आहे. ठेकेदाराला कामाचे पैसे नं मिळाल्यामुळे तो या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे नळपाणी योजनेला पाणी कधी येणार, याची प्रतीक्षा आहे.