सावकारीच्या पाशात नागरीकांची लुबाडणूक प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे. रविवारी अटक केलेल्या निलेश कीर यांच्या विरोधात करबुडे येथील एका तरुणांने तक्रार दाखल केली आहे. व्यावसायाने रिक्षा चालक असलेल्या जयवंत कळंबटे यांच्याकडून २० हजारांच्या कर्जाच्या बदल्यात निलेशने लाखो रुपये उकळत त्यांची ७.५ एकर जागा स्वतःच्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आता पर्यंत तिघांना या गुन्हात अटक करण्यात आली आहे. निलेश कीरने रत्नागिरी तालुक्यात सुमारे ५० कोटींच्या कर्जाचे वाटप केल्याचा पोलीसांचा अंदाज असून त्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरासह तालुक्यात सावकारीचे लोण मोठ्या प्रमाणातः पसरले आहे. काही व्यक्ती बँकेतून कर्ज उचलत असून तेच पैसे सावकारी धंद्यातही वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रत्नागिरी शहर पोलिसांकडे दाखल झालेल्या प्रकरणात निलेश कीर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याविरोधात आणखी एक तक्रार पोलिसांकडे आली आहे. तर निलेश कीर यांच्या समवेत आणखी तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. रविवारी निलेश शिवाजी कीर याला अटक केल्यानंतर त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एका महिलेसह दोघांना सोमवारी पोलीसांनी अटक केली आहे.
एक लाखाच्या बदल्यात २ लाख २४ हजार देवूनही चौघेजण त्यांच्याकडे ३ लाख ८० हजारांची मागणी करत होते. निलेश कीर या सावकाराचे अनेक कारनामे पोलिसांच्या कानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर कीर याच्याकडून कर्जाऊ पैसे घेतलेल्यांनी शहर पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करबुडे येथील जयवंत कळंबटे या तरुणाने वीस हजार रुपये कीर याच्याकडून घेतले होते. काही महिने त्याने आठवड्याला दोन हजार रुपये जमा केले. त्यानंतर एक हप्ता चुकल्याने त्याला दंड लावण्यात आला. तब्बल ७८ हजार रुपये उकळण्यात आल्यानंतरही वीस हजार रुपयांचे कर्ज फिटले नाही. त्यानंतर ७.५ एकर जागा नावावर करुन घेण्यात आली.
त्यापोटी स्टॅम्पड्युटीचे पैसे देण्यासाठी सातत्याने धमकी देण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलेश कीर हा नोंदणीकृत सावकार असून शासनानचे सर्व नियम धाब्यावर बसवून तो सावकारी करत होता. किरकोळ कर्जाच्या बदल्यात शहरासह तालुक्याप्त त्यांनी १०० हून अधिक चारचाकी, दुचाकी वाहनांच्या चांव्या आपल्या ताब्यात घेतल्या आहे. त्यातील काही टेम्पो, रिक्षा त्यांना दुसऱ्याला चालवायला दिल्या असून त्यांच्या कडूनतो प्रतिदिन पैसे घेत असल्याचे पुढे आले आहे.
कर्जवसूलीसाठी वारंवार धमक्या देणे नातेवाईकांना बोलवणे असे प्रकारही निलेश कीर व त्याच्या साथिदारांनी केले आहे. त्या तक्रारीही शहर पोलीस स्थानकात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेश कीरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे, दिपू साळवी यांच्यासह टिमने हि कारवाई केली. निलेश कीर याने ज्या गाड्यांच्या चाव्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यासर्व गाडी जप्त करण्याची कारवाई शहर पोलीसांनी सुरु केली आहे. मात्र काही महत्वाची कागदपत्रे निलेश कीर लपवत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.