कोकणात रेल्वे आली असली तरी रेल्वेत कोकण मात्र अभावाने दिसत आहे. सुमारे पंचवीस वर्षे लोटली तरी रेल्वे प्रशासनाकडून कोकणवासीयांवरील होत असलेला अन्याय काही थांबलेला नाही. त्याविरोधात पेटून उठलेल्या कोकणवासियांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार मुंबईत झालेल्या एल्गार सभेत करण्यात आला. त्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दरम्यान रेल्वेशी संबंधित मागण्यांपैकी किमान चार पाच म ागण्यांची पूर्तता येत्या २६ जानेवारीपर्यंत न झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर रेलरोको आंदोलन करताना वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडीच्या पुढे जाऊ देणार नाही असा खणखणीत इशारा समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिला आहे.
कोकणात रेल्वे येऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली. मात्र या कालावधीत कोकणला फारसा न्याय रेल्वे विभागाकडून मिळाला नाही. त्याचवेळी दक्षिणेकडील राज्यांना त्याचा लाभ होण्यासाठी प्रयत्न झाला. कोकणावर झालेल्या व होत असलेल्या अन्यायाविरोधात पेटून उठलेल्या कोकणवासियांच्या २२ संघटनांनी मुंबईतील परळ येथे एल्गार सभा आयोजित केली होती. यावेळी चांगल्या संख्येने कोकणवासीय उपस्थित होते. उपस्थितांनी रेल्वेशी संबंधित अनेक मुद्दे मांडताना असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
मागील २५ वर्षे सातत्याने होत असलेल्या प्रमुख मागण्यांकडे सावंतवाडीला सुसज्ज टर्मिनस बनवू त्याला प्रा. मधू दंडवते यांचे नाव दिले जावे, कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करून दुहेरीकरण करावे, वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे, कोकण रेल्वेतील गर्दी कमीकरण्यासाठी दादर चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे, मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे, सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस पूणे-मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात किंवा त्यांचे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे जास्तीचे थांबे द्यावेत, कोकणातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रेल्वेचे थांबे वाढवावे यांचा समावेश असून त्या मागण्यांवर सभेत मुख्य चर्चा झाली.
कोकणच्या हितासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करताना त्या समितीची शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला. समितीचे नूतन अध्यक्ष शांताराम नाईक यांनी सडेतोड भूमिका मांडताना आता आम्ही गप्प बसणार नाही. कोकणवासियांवरील होत असलेला अन्याय रेल्वे प्रशासनाकडून जर दूर झाला नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या मागण्यांपैकी किमान – पाच-सहा मागण्यांची पूर्तता २६ जानेवारी पर्यंत न झाल्यास नंतरच्या काळात रेल्वे मार्गावर रेलरोको करताना वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडीत अडविली जाईल असा इशारा अध्यक्ष श्री. नाईक यांनी दिला. अन्य मान्यवरांनी देखील रेल्वेशी संबंधित मुद्दे मांडले. आयोजित एल्गार सभेचे सूत्रसंचालन राजू कांबळे व यशवंत जड्यार यांनी केले.