28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunरघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. त्याचा फटका खेड तालुक्याला बसला आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात काल (ता. २) मध्यरात्री पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. या प्रकारामुळे आज सकाळी आकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकली. त्यात खोपी येथील शाळेत येणारे विद्यार्थीही होते. सुमारे तीन तास त्यांचा खोळंबा झाला तर रत्नागिरी शहराजवळील नाचणे येथे जोरदार वाऱ्यामुळे विद्युतखांब कोसळून एका चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, खांब कोसळले तेव्हा तिथे कोणीच नसल्याने दुखापत झालेली नाही. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ७०.२० मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड ५५.५०, खेड ७३.५७, दापोली ५४.५७, चिपळूण ६१.५६, गुहागर ३१.८०, संगमेश्वर ९०, रत्नागिरी ५८.४४, लांजा १०२.८०, राजापूर १०३.६२ मिमीची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज दिवसभर पावसाचा जोर सर्वत्र होता. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे रघुवीर घाटात दरड कोसळली. ही माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर दरड हटवण्याचे काम सुरू झाले. अकरा वाजण्याच्या सुमारास दरड हटवण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरड हटवल्यानंतर सकाळी ८.३० वाजता खेडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा असलेली बस तब्बल तीन तास उशिराने म्हणजेच ११.३० वाजता खेड बसस्थानकात पोहोचली. रघुवीर घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खेड तालुक्याबरोबरच रत्नागिरीतही वेगवान वाऱ्यासह जोरदार सरींनी झोडपून काढले आहे. रत्नागिरी शहराजवळील नाचणे परिसरात अचानक झालेल्या वादळामुळे दोन विद्युतखांब कोसळले. एका खांबाजवळ चारचाकी गाडी उभी होती. त्यावर खांब पडल्याने नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे समुद्रही खवळलेला आहे. किनारी भागात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

माहिती मिळण्यास होतो विलंब – रघुवीर घाट हा दोन जिल्ह्यांना जोडणारा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळत असल्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाच्यावतीने यंत्रणा सज्ज ठेवली आहे; पण मध्यरात्री दरड खाली आलीच तर जोपर्यंत दरड कोसळल्याची माहिती प्राप्त होत नाही तोपर्यंत यंत्रसामग्री घटनास्थळी नेणे शक्य होत नाही. त्यामुळे मार्ग मोकळा करण्यात विलंब होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular