जिल्ह्यात सोमवारी (ता. १८) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी १३४ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी दिवसभर कायम होता. त्याचा फटका रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाला बसला. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दख्खनजवळ डोंगरातील माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे रत्नागिरी आंबा घाटात वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. पाच मशीनच्या साह्याने माती हटवण्याचे काम सुरू केले. दिवसभर सतत पाऊस असल्यामुळे कामात अडथळा येत होता. यामुळे रत्नागिरीतून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यातील काही वाहतूक अणुस्कुरामार्गे वळविली होती. काही गाड्या चिपळूण-कन्हाडमार्गे सोडल्या, मात्र काही एसटी बसेस रद्द केल्या. कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने दोन्ही बाजूंनी रस्त्यावर उभी होती. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यात यश आले. या परिसरातून वाहने ने-आण करताना सावधगिरी बाळगण्यात आली आहे. तिथे वाहतूक पोलिस लक्ष ठेवून आहेत.
पावसाचा सर्वाधिक फटका दापोली तालुक्याला बसला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पूरस्थितीमुळे तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला असून, चार गावांतील सुमारे ३० हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच केळशी येथील खासगी कंपनीमध्ये पाणी शिरून तेथील सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सखल भागात पाणी साचल्यामुळे मंडणगड-दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दापोली शहरातील आंबेडकर स्मारकाजवळील संरक्षण भिंत कोसळून सव्वालाखाचे नुकसान झाले. मंडणगड तालुक्यात भारजा नदीला पूर आल्यामुळे चिंचघर-मांदिवली पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प होती. यामध्ये मंडणगड व दापोली तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
संगमेश्वर तालुक्यात नदीकिनाऱ्यावरील ३ दुकाने कोसळली असून, ३ लाखांचे नुकसान झाले आहे. बावनदीला आलेल्या पुराचे पाणी किनारी भागातील सखल भागात शिरले आहे. चिपळूणमध्ये वाशिष्ठीसह शिवनदीला पूर आला आहे. वाशिष्ठी नदीपात्राबाहेर बाजारपूल परिसरात पाणी आल्यामुळे शहरातील शाळांना सुटी देण्यात आली होती. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षाही रद्द करण्यात आली. खेड तालुक्यातील आवाशी गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, गावातील जवळपास सगळ्याच रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाले होते. त्याचा फटका जिल्हा परिषद शाळेला बसला आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात निरुळ येथील रमेश मेस्त्री यांच्या घराचे १५ हजार रुपये, चाफे येथील घराचे ६० हजार रुपये, जांभरुण येथील घराचे ७७ हजारांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे, जांभारी, आबलोली येथील पाच घरांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आसूद येथील दोन घरांना तडे – दापोली तालुक्यातील आसूद गणेश वाडी येथील हरिश्चंद्र माने, कल्पेश माने, रमेश माने यांच्या घरांना गेले दोन दिवस पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे तडे गेले आहेत. आसुद सरपंच कल्पेश, ग्रामपंचायत अधिकारी श्री. गजने, उपसरपंच नासिर मुरुडकर, तलाठी श्री. भागवत यांनी भेट दिली. डोंगराळ भागात घर असल्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन त्या दोन्ही घरातील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तूर्तास माने कुटुंबीय जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित होत आहेत असे तहसीलदार अर्चना भोंबे यांनी सांगितले. जगबुडी, नारंगी, कोदवलीच्या पातळीत वाढ खेड जगबुडी, नारंगी नदी धोका पातळीवरून वाहत होती. त्यामुळे किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सायंकाळी नदीची पातळी ७.३० मीटर इतकी होती. तसेच राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली होती. तिची इशारा पातळी ४.९० मीटर आहे. सायंकाळी ती ५.६० मीटरवर वाहत होती.
मच्छीमारीला फटका – मुसळधार पावसाबरोबर वेगवान वारे वाहत असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील मासेमारी ठप्प आहे. गिलनेट, ट्रॉलर्स मिळून सुमारे २ हजारांहून अधिक नौका बंदरात आहेत. प्रशासनाकडूनही मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर २२ ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रतिताशी राहणार असून, तो ६५ कि.मी. प्रतिताशीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या कालावधीत समुद्र वादळी वाऱ्यासह खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जाऊ नये.