लांजा (रत्नागिरी): डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर आणि वृद्धेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांचा मोह… यातून एका दूध विक्रेत्याने रचलेला हत्येचा कट ऐकून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सुन्न झाला आहे. लांजा तालुक्यातील वेरिवली बुद्रुक (लाडवाडी, रामगाव) येथे घडलेल्या ७६ वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येचा छडा अवघ्या काही तासांत लावण्यात लांजा पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद खेडेकर याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कर्जाची परतफेड आणि दागिन्यांची हाव
गावात दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या प्रमोद खेडेकरवर लोकांचे सुमारे २ ते ३ लाख रुपयांचे कर्ज झाले होते. सततच्या तगाद्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. याच दरम्यान त्याची नजर गावातील रहिवासी वैशाली विलास हेगिष्टे (वय ७६) यांच्या अंगावरील १३ ते १४ तोळे वजनाच्या मौल्यवान दागिन्यांवर पडली. हे दागिने लुटून आपले सर्व कर्ज फेडता येईल, या दुष्ट हेतूने त्याने तीन दिवसांपूर्वीच या हत्येची रूपरेषा आखली होती.
चिकाच्या दुधाचे आमिष आणि सुनियोजित कट
आपल्या योजनेनुसार आरोपी प्रमोदने अत्यंत थंड डोक्याने पावले उचलली. त्याने प्रथम वैशाली यांच्या मुलीला ‘घरी चिकाचे दूध आले आहे, ते घेऊन जा’ असे सांगून आपल्या घरी बोलावून घेतले. मुलगी घराबाहेर पडताच, घरात वैशाली एकट्याच असल्याची खात्री करून तो थेट त्यांच्या घरात घुसला. वृद्ध वैशाली यांना काही समजायच्या आत त्याने निर्दयपणे त्यांचे नाक आणि तोंड दाबून त्यांची हत्या केली.
त्यानंतर त्याने वृद्धेच्या हातातील अस्सल सोन्याच्या बांगड्या उतरवल्या आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून सोबत आणलेल्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट (इमिटेशन) बांगड्या त्यांच्या हातात चढवल्या.
गुन्ह्यानंतरचा थंड वावर आणि फायनान्समध्ये दागिने गहाण
हत्येसारखा भयंकर गुन्हा केल्यानंतरही प्रमोदच्या चेहऱ्यावर कसलीही भीती किंवा पश्चात्ताप नव्हता. तो शांतपणे आपल्या घरी परतला. थोड्याच वेळात वैशाली यांची मुलगी दूध घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली; प्रमोदने तिला नेहमीप्रमाणे चिकाचे दूध दिले आणि त्याचे पैसेही स्वीकारले.
यानंतर, लुटलेले खरे सोन्याचे दागिने त्याने एका महिलेच्या मदतीने एका खासगी फायनान्स कंपनीत गहाण ठेवले आणि त्यावर तब्बल ६ लाख रुपयांचे कर्ज उचलले. गावात काही घडलेच नाही अशा थाटात तो दिवसभर वावरत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करत होता.
एका जागरूक महिलेची साक्ष आणि खाकीचा हिसका
वृद्धेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तपासादरम्यान वाडीतील एका जागरूक महिलेने घटनेच्या सुमारास प्रमोदला त्या भागात संशयास्पदरीत्या फिरताना पाहिल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने सापळा रचून प्रमोदला ताब्यात घेतले. चौकशीच्या सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याचा खोटा आव गळून पडला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
लांजा पोलिसांनी आरोपी प्रमोद खेडेकरला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात त्याला आणखी कुणी मदत केली होती का? आणि फायनान्स कंपनीत दागिने गहाण ठेवताना नेमके काय घडले? या दिशेने लांजा पोलीस आता अधिक सखोल तपास करत आहेत.

