कोकणामध्ये विविध ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात घडण्याच्या घटना घडणे सुरूच आहे. असाच अपघात रत्नागिरी जिल्ह्यात लांज्याहून वाडगावला जाणाऱ्या एसटी बसचा बेनी धरणाजवळ झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने धरणामध्ये खाली पाण्यात कोसळली नाही. एसटी मध्ये प्रवास करणारी मुले आणि इतर प्रवासी केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले. याच वेळी या बसची धडक एका रिक्षाला बसल्याने रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारनंतर घडल्याची माहिती समोर आली आहे.
लांजा बसस्थानकातून दुपारी १ वाजता ही बस विद्यार्थी व प्रवासी यांना घेऊन निघाली असता, स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन आटोपून जवळजवळ २५ ते ३० विद्यार्थी या बस क्र. एमएच १४ बीटी ३००५ ने निघाले. त्यामध्ये काही स्थानिक अन्य प्रवासी देखील होते. दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान बेनी येथे बसची रिक्षाला एमएच ०८ के २५६५ धडक बसली. त्यामुळे अचानक झालेल्या धडकेने एस. टी. चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस साईटपट्टी सोडून शेजारी असलेल्या झाडाला अडकून थांबली.
परंतु, जर बस झाडाला अडकून थांबली नसती तर ती सर्व प्रवाशांसह थेट धरणाच्या पाण्यात गेली असती. गाडी थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी व प्रवाशांना गाडीतून सुरक्षित काढण्यात आले. पुढील धोका लक्षात घेता, वाहकाने बस झाडावर अडकवल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. अनेकवेळा रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामकाजामुळे तर काही वेळा वाहन चालकांमुळे देखील भीषण अपघात घडतात. कोकणात येणाऱ्या सर्वच महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांचे काम अनेक महिने सुरु असल्याने अपघातांच्या घटना थांबायचे नावच घेत नाही आहेत.