रत्नागिरीमध्ये मागील बऱ्याच महिन्यापासून, वन्य प्राण्यांच्या अवयवाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी व्हेल माश्याची उलटी जिची किंमत साधारण करोडो रुपयांमध्ये असते ती विकण्यासाठी आलेला एकजण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. तळ कोकणातून वन्य जीवांचे अवयव विक्रीसाठी अनेक जण येतात, परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येतात.
काल सुद्धा कणकवली येथील ५६ वर्षीय इसमाला बिबट्याच्या कातडीसह लांजा येथे ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि लांजा पोलीस स्थानक मार्फत कुवे गणपती मंदिर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरी पथक सायंकाळी ४ ते ५ यावेळेत गस्त घालत होते.
सायंकाळी ४.३० वा. दरम्याने कुवे गणपती मंदिर येथील हॉटेल आर्याप्रसाद समोर असताना सिंधुदुर्गकडून रत्नागिरीच्या दिशेने ओमनी घेवून जाणारे चालक विद्याधर प्रभाकर भिडे वय – ५६ रा. कणकवली हे आपल्या ताब्यातील ओमनी क्र. एम. एच. ०७ ए. जी. ०५१३ हे कुवे गणपती मंदिर येथे आले असता पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांची गाडी थांबवून चौकशी केली. त्यांची एकूण हालचाल संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता गाडीच्या सिटच्या खाली बिबट्याचे कातडे आढळून आले. पोलिसांनी गाडी आणि मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
गुन्हा अन्वेषण विभाग व लांजा पोलीस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्यासह लांजा पोलीस पथक यांच्या मार्फत घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री विद्याधर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे अधिकचा तपास करत आहेत.