कोकणात दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त रीतीने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरीसह इतर कोकणात दाखल झाले होते. काहींचे दीड, पाच, सात, नऊ दिवसांचे विसर्जन आटपून अनेक चाकरमानी मार्गस्थ देखील झाले. गौरी गणपती विसर्जनानंतर ५ सप्टेंबरपासून चाकरमान्यांनी परतीची वाट धरली होती.
तालुक्यातील लांजा आगारामार्फत ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने विविध ठिकाणच्या जादा एसटी फेर्या सोडण्यात आल्या. प्रवाशांच्या मागणी प्रमाणे लांजा-बोरिवली, परेल, मुंबई सेंट्रल, नालासोपारा, ठाणे, विठ्ठलवाडी या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आल्याने, प्रवाशांनी देखील ग्रुप बुकिंग केले होते.
लांजा एसटी आगाराने गणेशोत्सव काळात चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १४१ जादा फेऱ्या सोडल्या. सुयोग्य नियोजन आणि चोख व्यवस्था त्यातून लांजा आगाराने ३७ लाख ३७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. म्हणजे कोरोन काळाच्या सावटानंतर खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला म्हटल तर वावग ठरणार नाही.
लांजा आगाराने यावर्षी सुयोग्य नियोजनामुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर झाला. सोडलेल्या जड गाड्यांच्या फेऱ्यांमुळे आगाराला ३७ लाख ३७ हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे. या जादाच्या १४१ फेऱ्यांतून ६ हजार ३२७ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे लांजा आगाराचे उत्पन्न वाढल्याचे आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी सांगितले.
दोन वर्षांचा कोरोना कालावधी आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन यामुळेच एसटीची संपूर्ण आर्थिक घडीच निखळून पडली होती. यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सवाच्या माध्यमातून लांजा एसटी आगाराला इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. तर रेल्वे, खाजगी वाहतूक सुद्धा उपलब्ध असताना देखील, पुन्हा एकदा प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसला पसंती दिल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.