रत्नागिरी शहरी भागातील मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे पडून चाळण झाली आहे. ठेकेदाराला वारंवार सूचना देऊन देखील परिस्थिती बदलण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अखेर भाजप आणि काँग्रेसच्या सततच्या मागणीमुळे आठवडा बाजार ते काँग्रेसभवन दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी ठेकेदाराने रस्त्याचे एवढे निकृष्ट दर्जाचे काम केले होते की, अवघ्या चार महिन्यांतच रस्त्याची पूर्णत: वाताहत झाली.
रस्त्यात एवढे मोठे आणि खोल खड्डे पडले की, वाहनधारकांना कसरत करत येथून वाहने चालवावी लागत होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्या दरम्यान तात्पूरती कामचलाऊ मलमपट्टीचा दिखावा करण्यात आला होता, पण ते काम देखील काही दिवसांतच उखडले. त्यामुळे रत्नागिरीच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रपणे हा विषय लावून धरल्यानंतर पालिकेने ठेकेदाराला अंतिम नोटीस बजवाल्यानंतर ठेकेदार चांगलाच वठणीवर आला असून, एका रात्रीत हे काम करण्यात आले आहे.
सुधारित पाणी योजना आणि सीएनजी गॅस पाइपलाईन टाकण्यासाठी शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वीच म्हणजे चार महिन्यांपूर्वी शहरातील रस्ते ९ कोटी रुपये खर्च करून करण्यात केले होते; परंतु पहिल्या पावसातच या रस्त्यांची वाताहत झाली. रस्ते करताना शहराचे माळनाक्यापासून वर आणि खाली, असे दोन भाग करण्यात आले. आठवडा बाजार ते काँग्रेसभवन या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक झाली होती. या भागातून खड्डे चुकवून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरतच. त्यामुळे काँग्रेसने या रस्त्याविरोधात आंदोलन केली. त्यानंतर श्रमदानातून खड्डे भरण्यात आले. तरी पालिका प्रशासनाला जाग आली नाही.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण महामार्गाची पाहणी करून आठवडा बाजार येथील भाजपच्या कार्यालयाला भेट देणार होते. भाजप पदाधिकाऱ्यानी मुख्याधिकाऱ्यांना भेटून तत्काळ या रस्त्याचे काम करण्यास सांगितले; मात्र ठेकेदाराने प्रशासनाच्या मागणीला धुडकावून लावले होते. भाजप आणि काँग्रेसच्या रेट्याने पालिकेने ठेकेदाराला अंतिम नोटीस काढल्यानंतर त्याची दखल घेऊन हा रस्ता शुक्रवारी एका रात्रीमध्ये करण्यात आला.