नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पारंपारिक संस्कृती, इतिहास, धर्म इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना “जिजामाता विद्वत् गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात येते. मागील ३९ वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण होत आहे. हे पुरस्काराचे चाळीसावे वर्ष असून यंदाचा पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रदान केला जाणार असल्याची माहिती शिवकथाकार तथा छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सद्गुरूदास महाराज विजयराव देशमुख यांनी दिली.
आज गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा ९२ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या प्रतिष्ठानने या पुरस्काराची घोषणा करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल शुभेच्छा भेट दिली आहे. हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जाणारा असून त्याचे स्वरूप १ लाख ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. सदर कार्यक्रमाला छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय देशमुख, सचिव भालचंद्र देशकर यांची विशेष उपस्थिती होती. सध्या राज्यामध्ये कोरोनाची स्थिती सुधारत असली तरी, असणाऱ्या निर्बंधांमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरणाचा विस्तारित जाहीर कार्यक्रम करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या आधीसुद्धा अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, सेतू माधवराव पगडी, गो. नी. दांडेकर, चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, पद्मविभूषण तथा महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस, धुंडा महाराज देगलूरकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रामचंद्र देखणे, पंडित महादेवशास्त्री जोशी यांसह ३८ मान्यवरांना जिजामाता विद्वत् गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.