पत्र देणारे बेळगावला किती वेळा गेले? काही लोक फक्त पत्र देतात. जे तिथे गेलेच नाही त्यांनी पत्र देऊन उपयोग नाही. त्यांना सीमावासियांच्या वेदना कळणार नाहीत, असा टोला आमदार उदय सामंत यांनी उबाठाच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना लगावला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, असेदेखील आ. सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीत हिंदू जनजागृती समि तीच्यावतीने बांगादेशातील हिंदूच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आ. उदय सामंत उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ. उदय सामंत यांनी बेळगावातील सीमावासियांविरोधात होणाऱ्या दडपशाहीविरोधात आवाज उठविला.
हिटलरशाहीचा निषेध – यावेळी बोलताना आ. उदय सामंत पुढे म्हणाले की, बेळगावात महाराष्ट्राच्या नेत्यांना कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची हिटलरशाही असून आम्ही या हिटलरशाहीचा तसेच कर्नाटक सरकारने सावरकरांचा अपमान केल्याने आम्ही या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो.
तर माझ्या शुभेच्छा ! – मंत्रीमंडळ स्थापन झालं आहे. केवळ विस्तार होणे बाकी आहे. मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. तुमच्या माध्यमातून. मी १४ तारखेला मंत्रीमंडळ विस्तार आहे, असे ऐकतो आहे. १४ तारखेच्या मंत्रीमंडळ विस्ताराला माझ्या शुभेच्छा आहेत, असे सांगून त्यांनी विस्ताराबाबत सस्पेंस निर्माण केला आहे.
त्या सीमा भागात कधी गेल्या? – उबाठाच्या राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यावर बोलताना आ. सामंत यांनी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना टोला लगावला. सीमा भागासाठी पत्र देणारे सीमा भागात किती वेळा गेले? महायुतीचे सरकार सीमा भागातल्या लोकांबरोबर आहे हे आम्ही सिद्ध केले आहे. जे तिथे गेलेच नाहीत त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही. त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत, असा टोला आ. सामंत यांनी लगावला.
त्यात गैर काय ? – मुख्यमंत्र्यांची उद्योजक गौतम अदानींनी भेट घेतली याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले की, गौतम अदानी हे फार मोठे उद्योजक आहेत. २ महिन्यांपूर्वी त्यांनी शरद पवार यांचीसुद्धा भेट घेतली होती. उद्योजकांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री यांची भेट घेणे यात गैर काय? रखडलेल्या प्रकल्पांसाठी ही भेट घेतली असेल, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या मंत्रीपदाबाबत सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि कोणाला मंत्रीमंडळ मिळणार हे येत्या २ दिवसांत तुम्हाला कळेल. या २ दिवसांचा सस्पेंस तुम्ही कायम ठेवा, अशी मिश्किल टीपणीही त्यांनी यावेळी केली.
खात्यांसाठी चर्चा अडकली नाही – रोज सकाळी ऐकायला मिळतेय, गृहखात्यावरुन मंत्रीमंडळाची चर्चा अडकून राहिली आहे. मात्र अशा कुठल्याही खात्यासाठी चर्चा अडलेली नाही. सन्मानपूर्वक मंत्रीपदाचे वाटप होईल. याची पूर्ण खात्री आम्हाला आहे.
अहो मी रत्नागिरीचा आमदार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईडीने अद्यापही क्लिन चीट दिलेली नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, अहो मी रत्नागिरीचा आमदार, तुम्ही राज्याचा प्रश्न मला विचारताय ! मी कोणाच्याही वैयक्तीक बाबींमध्ये बोलणे योग्य नाही. ज्या यंत्रणा चौकशी करत होत्या, त्या योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही – शेतकऱ्यांची जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात जाणार का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, वक्फ बोर्डने घेतलेली जमीन शेतकऱ्यांची कूळ म्हणून किती वर्ष मालकीची आहे? हेदेखील पाहिले जाईल. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दखल राज्य शासनाने घेतली आहे.