शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. यात आता चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांची भर पडली आहे. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी प्रथम ठाकरे गटाची साथ सोडली. त्यानंतर रांगच लागली आहे. शहरप्रमुख उमेश सकपाळ, उपशहरप्रमुख महंमद फकीर यांच्यासह पालिकेतील पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख सचिन कदम, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेना उबाठा चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिला. यामुळे शिवसेना उबाठा पक्षात अस्वस्थता पसरली असून, ते भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
काही वर्षांपूर्वी मोदी यांनी पत्रकारिता केली. २० वर्षांपूर्वी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. सलग तिन्हीवेळा ते नगरसेवक झाले. उमेश सकपाळ यांनी शिवेसनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर मोदी यांच्याकडे शिवसेना उबाठा पक्षाच्या चिपळूण शहरप्रमुखपदाची जबाबदारी आली होती; मात्र आता त्यांनीही साथ सोडली. याबाबतचे त्यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मोदी यांनी म्हटले आहे की, ‘मी कोणावरही नाराज नाही. भविष्यात माझ्याबद्दल कोणी काही बोलले तरी मी त्याला प्रतिउत्तर देणार नाही. शिवसैनिक म्हणून जिथे जिथे लढायचे होते, तिथे नेहमी अग्रेसर राहिलो आहे.’