रत्नागिरी जिल्ह्यात हिंस्र पशुंचे भर वस्तीत येऊन मानवी आणि पाळीवप्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चरवेली गावामधील रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्याच्या घराच्या बाजूच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे.
काही दिवसांपूर्वी चरवेली, वेळवंड, वळके सीमेजवळ फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी या परीसरात गेलेल्या नागरीकांसमोर बिबट्याने पाली वळके रस्ता अचानक झेप घेत ओलांडला व तो पलीकडील जंगलमय भागात निघून गेला. काही दिवसात त्याच परिसरातील चार ते पाच कुत्रे बिबट्याने मारल्याने आता बिबट्या सवयीने नागरी वस्तीत सारखा वावरत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळाले अधिक माहिती अशी की, दि. १० डिसेंबरला रात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील चरवेली बौद्धवाडी येथील रस्त्याच्या लगत असणाऱ्या सिद्धार्थ रावजी सावंत या शेतकऱ्याच्या घराच्या बाजूच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले.
मागील महिन्यापासून हा बिबट्याचा सततचा वावर मुख्य नागरी वस्तीच्या भागात होत असल्याने, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तेथूनच अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वेळवंड नावाचे गाव आहे. या गावांचा जंगलमय परिसर असून येथे मागील काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये सहजरीत्या येत आहेत. तसेच सध्या गवत कापणीचा हंगाम असल्याने शेतकरी शेतामध्ये कापणीस जाण्यास बिबट्याच्या भीतीमुळे घाबरत आहेत. त्यामुळे चरवेली गावामध्ये या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा व कॅमेरे लावण्याची मागणी ग्रामस्थ सदाशिव लेले यांनी वन विभागाकडे केली आहे.