कोरोना कालावधीपासून रत्नागिरी ते दिवादरम्यान धावणाऱ्या रत्नागिरी पॅसेंजर गाडीमुळे दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालासोपारा, गुजरात येथे स्थायिक असणाऱ्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक झाले आहे. दिव्याला प्रवास करण्यासाठी रेल्वेशिवाय इतर सोयीस्कर पर्याय नसल्याने लांबून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे रत्नागिरी ते दादर अथवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापर्यंत चालवावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय म्हाप्दी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पूर्वी केआर थ्री फोर व आता रत्नागिरी लोकमान्य टिळक टर्मिनस पॅसेंजर गाडी सुरू झाली. नंतर लोकाग्रहास्तव ती रत्नागिरी-दादर मार्गावर धावू लागली. सर्वच स्थानकांवर थांबत असल्यामुळे ती सर्वात लोकप्रिय ठरली.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतील सर्वच लहान-मोठ्या गावांतून सकाळी लवकर निघून मुंबई शहरात पोहोचून दुपारपर्यंत आपली कामे आवरून त्याच दिवशी गावी परत जाण्यासाठी सर्वांनाच या गाडीचा मोठा आधार होता; परंतु २०२० च्या शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्यरेल्वे ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी दिव्यापर्यंत धावते. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालासोपारा, गुजरात येथे स्थायिक असणाऱ्या कोकणवासियांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक आहे. तसेच, दिव्याला प्रवास करण्यासाठी रेल्वेशिवाय इतर सोयीस्कर पर्याय नसल्याने लांबून येणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. वक्तशीरपणा सुधारण्यासाठी केलेल्या बदलाचा प्रवाशांना त्रास तर झालाच; परंतु गाडीच्या वक्तशीरपणातही काहीही फरक पडलेला नाही.
मध्यरेल्वेवरील ९ थांबे कमी करूनही सदर गाडीला पूर्वीचाच प्रवास वेळ दिलेला आहे. ही गाडी कधीच दिव्याला निर्धारित वेळेत पोहोचत नाही. तसेच वारंवार लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी ही गाडी पुन्हा दादरला नेण्याची मागणी केल्यावर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणारे रेल्वे प्रशासन त्याच वेळेत त्याच दादर स्थानकातून गोरखपूर व बलियासाठी विशेष रेल्वे चालवत आहे. रत्नागिरी- दिवा पॅसेंजर व सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस गाड्या दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत चालवण्यासाठी पाठपुरावा करावा. मुंबईतून रत्नागिरी किंवा सावंतवाडीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये दिव्याला उघडणारे ४ ते ५ राखीव डबे ठेवावेत, अशी मागणीही म्हाप्दी यांनी केली आहे.