रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. घटना शनिवारी (दि. १०) रोजी सकाळी उघडकीस आली. ५ ते ६ दिवसांपुर्वी हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. श्री. वळवी हे आपल्या खाजगी कामानिमित्ताने १० दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. घरमालक घरी नसल्यामुळे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना अनेक दिवस कोणाच्याही लक्षात आली नाही. परिसरातील कामगारांना विहिरीतून कुबट वास येऊ लागल्याने त्यांनी शोध घेतला असता भक्ष्यांच्या शोधामध्ये असताना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. साधारणतः सात ते आठ वर्षांचा हा नर जातीचा बिबट्या होता.
बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समजतात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती. परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनरक्षक विभागाचे एन. एस. गावडे, या विभागाच्या शर्वरी कदम यांच्या मदतीला खालगाव जाकादेवी येथील सेवाभावी ग्रामस्थ, तरूणांनी शर्तीचे प्रयत्न करून मोठ्या कौशल्याने खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या शवाची तपासणी केली. शव पी.एम. करण्यायोग्य नसल्याने शव जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी वनरक्षक विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय विभागांचे कर्मचारी, खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते कैलास खेडेकर परिसरातील सेवाभावी ग्रामस्थ, सेवाभावी तरूण कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

