प्रचंड जंगल तोडीमुळे बिबट्यासारखे अनेक हिंसक प्राणी मानवी वस्तीत घुसत असून प्रामुख्याने मध्यरात्री शेतकरी झोपला असताना गाय, म्हैस, बैल यांचा फडशा फाडत आहेत. बऱ्याचवेळा कुत्र्यासारख्या शिकारीचा पाठलाग करत बिबट्या घरात घुसल्याच्याही घटना घडत आहेत. मंगळवारी रात्री अशाच एका घटनेत रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये चक्क बिबट्या शिरला आणि त्याने, तेथे असलेल्या सीसीटिव्हीमध्ये बिबट्याने केलेल्या या शिकारीचे दृष्य कैद झाले असून ते पाहिल्यावर हॉटेलम धील अनेकांचे धाबे दणाणले. मात्र चोर पावलाने हॉटेलमध्ये घुसलेल्या बिबट्याने अन्य कोणालाही काही केले नाही.
हॉटेलात घुसला – मध्यरात्री तो हॉटेलमध्ये घुसला. तो भुकेला असावा. हॉटेल चालू असले तरी तशी सामसूमच होती. रिसेप्शन कांउंटरवर कोणीही नव्हते. या काउंटरशेजारी असलेल्या टेबलच्या एका बाजूला एक कुत्रा झोपला होता. बिबट्याने त्याच्यावर झडप टाकली. आपली शिकार तोंडात पकडून गप गुमाने बिबट्या निघूनही गेला. कोणालाही पत्ता लागला नाही. सकाळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृष्य कैद झाल्याचे दिसताच रात्री काय झाले याची चर्चा आता सुरु झाली आहे.
बिबट्याचा संचार – दरम्यान साखरपा आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा संचार वाढत आहे. १५ दिवसांपूर्वी बिबट्याने प्राण्यांवर हल्ला केल्याच्या दोन घटना साखरपा परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर सुरु असून वन खात्याने त्याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरांतील शेतकरी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता हॉटेलात बिबट्या शिरल्याच्या घटनेने परिसरातील लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.