21.1 C
Ratnagiri
Sunday, December 21, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeRajapurराजापुरात दिवसाढवळ्या बिबट्याची दुचाकीवर झडप

राजापुरात दिवसाढवळ्या बिबट्याची दुचाकीवर झडप

ओझरहून त्या दुचाकीवरून पती व मुलासह राजापूरकडे निघाल्या होत्या.

राजापूर तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी गुरूवारी १२ जून रोजी सकाळी ९ वा. च्या सुमारास दिवसाढवळ्या दुचाकीवर बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यात ओझर येथील श्रीम. अमिना मन्सूर मापारी जखमी झाल्या आहेत. ओझरहून त्या दुचाकीवरून पती व मुलासह राजापूरकडे निघाल्या होत्या. याबाबत अधिक वृत्त असे की, ओझरमधील ग्रामस्थ मन्सूर अकबर मापारी हे पत्नी व ‘मुलगा यांच्यासह त्यांची दुचाकीवरून राजापूर येथे निघालेले असताना तिवरे याठिकाणी आले असता त्यांच्या दुचाकीवर अचानक आलेल्या बिबट्याने झडप घातली. त्यांनी ही झेप चुकवण्याचा प्रयत्नात दुचाकी बाजुला घेत गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र मागे बसलेल्या पत्नी श्रीम. अमिना मन्सूर मापारी यांच्यावर बिबट्याने झडप घातली. या घटनेत श्रीम. अमिना मापारी यांच्या उजव्या पायाच्या गुढग्याला बिबट्याची नखे लागली. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी येथे उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

सुदैवाने याचवेळी मागाहून एक रिक्षा येत असल्याने बिबट्याने रस्त्यावरून पळ काढल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ही घटना वनअधिकारी यांना समजताच त्यांनी जागेवर धाव घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांचे जाबजबाब नोंदविले आहेत व घटनास्थळी जाऊन वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार, नितेश गुरव यांनी पाहणी केली आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनअधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई यांनी केले आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मापारी कुटुंबियांना शासन-प्रशासन कोणती आर्थिक मदत करणार आहे असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. तर ओझरमधील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रकाश पाध्ये यांनी आपल्या अंगणातून सदैव बिबट्याचा वावर असून याचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular