जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. आरवली राजवाडी येथे वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला; तर राजापूर तालुक्यातील तेरवण गावात फासकीत अडकून जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली-राजवाडी येथील मारुती मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ३) सकाळच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. बिबट्या रात्री महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली असावी. यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी महामार्गावर बिबट्याचा मृतदेह निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वन विभागाला कळवले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.
दुसरी घटना राजापूर तालुक्यातील तेरवण येथे घडली. येथील विजय नारायण सरफरे (रा. भू) यांच्या मालकीच्या आंबा बागेमध्ये बिबट्या फासकीमध्ये अडकला. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अनोळखीने ही फासकी लावली होती. याबाबत आनंद राजाराम पाध्ये यांनी वनविभागाला कळविले. यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. बिबट्याची फासकीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर राजापूरचे पशुधन विकास अधिकारी वैभव चापडे, पशुधन पर्यवेक्षक संतोष गोरे व कोल्हापुरातील वनविभागाचे डॉ. वाळवेकर हे उपचार करीत होते. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या नर असून, त्याचे वय सुमारे ४ ते ५ वर्षे असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वनविभागातर्फे मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली.
बागेलगत झुडपामध्ये अडकला – बिबट्या हा फासकीत अडकला असल्याचे दिसून आले. त्याने सुटकेसाठी प्रयत्न करत फासकी तोडली, मात्र तो आंबा बागेलगत झुडपामध्ये अडकल्याचे दिसून आले. वन विभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीमने बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून पिजऱ्यामध्ये जेरबंद केले होते. हा बिबट्या जखमी झाला होता.
बिबट्याचे शवविच्छेदन – मृत बिबट्याला शासकीय वाहनातून रानतळे येथे वन विभागाच्या अखत्यारितील वनरक्षक निवासस्थान आवारामध्ये आणण्यात आले. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याचे विच्छेदन केले. बिबट्याचे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उष्माघात आणि फुफ्फुसाला झालेल्या इन्फेक्शनमुळे बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अहवाल पशुधन विकास अधिकारी यांनी दिला आहे.