अरबी समुद्राच्या किनाऱ्यापासून सह्याद्रीच्या टोकापर्यंत पसरलेला राजापूर, लांजा, साखरपा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. मागील अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे. पुढील ५ वर्षांत राज्यातील विधानसभा मतदारसंघांपैकी मॉडेल मतदारसंघ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रोजगार या विषयाला प्राधान्य देऊन एक मोठा उद्योग आणून कायापालट करू, असे मत आमदार किरण उर्फ भैया सामंत व्यक्त केले. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते. राज्यात ज्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व मंत्री करत आहेत त्या मंत्र्याचे मतदारसंघ विकसित झाले आहेत; मात्र राजापूर- लांजा मतदारसंघ अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत राहिला आहे. त्यामुळे राज्यातील मॉडेल मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ विकसित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.
विशेषतः अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांची कामे अर्धवट आहेत. रस्ते, आरोग्य, शाळा हे प्रश्न आहेतच; परंतु महत्त्वाचा रोजगाराचा प्रश्न मतदार संघाला भेडसावत आहे. रोजगारासाठी येथील तरुण पिढी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांना जवळ करत आहेत. त्यामुळे येथील तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी राज्यातील सर्वात मोठा उद्योग राजापूर-लांजा मतदारसंघात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरच आपण तो जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक विकासकामे ही नुसती पत्रे देऊन होत नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. कामे वेळेवर का होत नाहीत हेही पाहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.