जयगड परिसरात वायूगळती झाल्यामुळे अनेक मुलांना, नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. आताही तेथे उभारण्यात येत असलेल्या जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांचा विरोध आहे. त्याकडे कंपनी दुर्लक्ष करत आहे. ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता कंपनीने मनमानी केली तर कायदेशीर लढाई लढू, असे नवी मुंबई येथील अॅड. रोशन पाटील यांनी नांदिवडे (जयगड, ता. रत्नागिरी) येथे आयोजित सभेत सांगितले. जयगड परिसरातील आरोग्य, जैवविविधता, पर्यटन या सर्व बाबी अबाधित राहाव्यात तसेच या सर्व विषयांवर सविस्तर साधकबाधक चर्चा व्हावी, या हेतूने नांदिवडे-जयगड येथील त्रिमूर्ती नाट्यमंडळ सभागृहात आयोजित जनप्रबोधन सभेत ते बोलत होते. या सभेला जयगड दशक्रोशीतून सुमारे ७०० ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. या वेळी अॅड. पाटील म्हणाले, ‘जयगड दशक्रोशीचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरामध्ये विविध उद्योगसमूह व्यवसाय करण्यासाठी आले.
सुरुवातीला इथल्या स्थानिक तरुण-तरुणींना, व्यवसाय-धंदा मिळेल. येथील आरोग्य, पायाभूत सुविधा सुधारतील हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून येथील सर्वसामान्य जनतेने आपली वडलोपर्जित जागा कवडीमोल दराने या उद्योगसमूहांना विकली. कंपन्यांना जागा मिळाली, उद्योगधंदे उभे राहिले; मात्र दुर्दैवाची बाब अशी की, आज पाठी वळून पाहिले तर ना नोकरीधंदा, ना पायाभूत सुविधा, ना आरोग्ययंत्रणा. आपल्या परिसरात उद्योगधंदे आलेच पाहिजे यात तीळमात्र शंका नाही; मात्र हे उद्योग या ठिकाणी येऊन इथल्या सर्वसामान्य जनतेचे अस्तित्व संपवत असतील तर एक सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी संविधानिक पद्धतीने या संदर्भात आवाज उठवला पाहिजे.’ या सभेला सर्वश्री अनिरूद्ध साळवी, प्रमोद घाटगे, जयवंत आडाव, संतोष हळदणकर, समीर पार्कर, अविनाश देवरूखकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.