तालुक्यातील वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधातील लढा इथून पुढे एकत्रित लढू, अशी ग्वाही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल (ता. ११) संघर्ष समितीचे प्रमुख प्रथमेश गवाणकर यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी समितीची भूमिका समजून घेतली. शेतकऱ्यांचा व जनतेचा विरोध का आहे? जमीन खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये नक्की कुणाचा हात आहे? शासन व प्रशासन कशा पद्धतीने ग्रामस्थांना वेठीस धरून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर चर्चा केली. तसेच भविष्यात आंदोलनाची दिशा कशी असेल, याबाबतीत दिशा निश्चित करण्यात आली. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल आणि ती ग्रामस्थांच्या बाजूने असेल, असे मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, अरविंद मालाडकर, महेंद्र गुळेकर, सचिन शिंदे, रूपेश चव्हाण, किशोर कुळ्ये, सत्यविजय खाडे आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष सहदेव वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू – आजपर्यंत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी सर्वसामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आहेत. कोकण निसर्गसंपन्न आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून येथील विकास झाला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी राज ठाकरे यांची आहे, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी ठणकावून सांगितले.