आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायत निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. कालच याबाबत शिवसेना नेते उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. एकदिलाने लढून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवू, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी व्यक्त केला. मंत्री सामंत यांच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नेते सुदेश मयेकर, विजय खेडेकर, महिला संघटक कांचन नागवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पंडित म्हणाले, “महायुती म्हणून यापूर्वी देखील लोकसभा निवडणुका लढल्या. त्यामध्ये यश मिळाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत तर सर्वांत मोठा विजय महायुतीला मिळाला. एकत्रित निवडणूक लढण्याचा मोठा फायदा महायुतीला झाला आहे. त्यामुळे यापूर्वी अडीच वर्षांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने चांगले काम केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवत पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सर्वसामान्यांना न्याय देत सरकार गतिमान केले आहे. एकदिलाने आणि एकसंघ काम केल्यामुळे राज्यात जसा महायुतीचा भगवा फडकला, तसाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती आणि एकत्रित लढून जिल्ह्यात पुन्हा महायुतीचा भगवा फडकवू. सत्तेत आल्यापासून मंत्री सामंत, आमदार किरण सामंत यांनी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात विकासनिधी आणला आहे. पर्यटनक्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी केली आहे. रत्नागिरी शैक्षणिक हब बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.” जागा वाटपाबाबत लवकरच धोरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या नेत्यांची लवकरच महायुतीबाबत बैठक होणार आहे. त्यामध्येही युतीची एकत्रित घोषणा केली जाणार आहे. त्या दरम्यान जागा वाटपाचे धोरण निश्चित केले जाईल, असेही पंडित म्हणाले.