काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये थकीत विजबिला प्रकरणी बैठक पार पडली. उर्जा मंत्री नितीन राउत यांनी जी सद्य परिस्थिती आहे ती कथन केली, आणि जर वीजबिल वेळीच भरले नाही तर राज्यामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
कोकण परिमंडळ व त्याअंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण थकीत वीजबिल परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी कोंकण परिमंडळ कार्यालय येथील मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता विनोद पाटील हे उपस्थित होते.
कोरोनाच्या काळापासून म्हणजेच मार्च २०२० पासून सर्व व्यवहार ठप्प झाल्याने, अनेकानी नोकरी व्यवसाय गमावल्याने उत्पन्नाचे साधनच काही उरले नसल्याने, अनेक जणांची मुलांच्या फीपासून ते वीजबिलापर्यंत सर्वच थकीत आहे. परंतु, महावितरणावर असलेल्या कोटींच्या थकबाकीमुळे, थकीत असणाऱ्या वीज ग्राहकांचे सप्टेंबर अखेर चालू वीज देयक भरणा करण्यासाठी ताबडतोब वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक आणि कोकण प्रादेशिक संचालक प्रसाद रेषमे यांनी दिले आहेत.
त्यासाठी ० ते ३० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर तपासणे, तसेच कागदोपत्री वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी गरजेचे असल्याचे प्रतिपादन महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक आणि कोकण प्रादेशिक संचालक प्रसाद रेषमे यांनी केले आहे. महावितरण कंपनीच्या महसूल वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते पुढे म्हणाले. अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपात खंडित केलेल्या ग्राहकांचे वीज वापर आणि जोडणी तपासण्यासाठी विशेष लक्ष घालण्यात यावे यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.