कुंभार्ली घाटातून चिपळूण-कराडमार्गे हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत हा मार्ग पूर्ण बंद होता. शुक्रवारी सकाळपासून हलक्या वाहनांसाठी हा मार्ग सुरू करण्यात आला. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६च्या रूंदीकरणाचे काम सुरू असताना पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने १६ जून रोजी पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता हलक्या वाहनांना खुला करण्यात आला; मात्र, पावसाचे वाढलेले प्रमाण व साचत असेलल्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने येथून जड वाहने सोडण्यात आली नाहीत. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७जून रात्री १२ वाजेपर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे; मात्र वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक सुरू केली आहे.
पाटणचा रस्ता बंद झाल्यानंतर पोलिसांनी मुख्य मार्ग बंद करून पर्यायी मागनि वाहतूक सुरू केली होती. ज्या ठिकाणावरून वाहतूक वळवली आहे अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. चिपळूणमध्ये बहादूरशेख नाका आणि शिरगाव नाका येथे पोलिसांचा बंदोबस्त होता. बहादूरशेख आणि शिरगाव नाक्यावर पोलिस कर्मचारी वाहनचालकांना मार्गदर्शन करण्याचे काम करत होते; मात्र पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघात होण्याचा धोका लक्षात घेत हा मार्गही बंद करण्यात होता. ज्या मार्गावरून हलकी वाहने सोडली जात होती त्या मार्गावरून अवजड वाहतुकीची वाहनेही सोडली जात होती. त्यामुळे मागील दोन दिवस पोलिसांनी नाकाबंदी केली. अवजड वाहने परत पाठवली. पोलिस नाक्यावर असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी स्वतःहून मार्ग बदलले; मात्र आज सकाळपासून हलक्या वाहनांसाठी हा मार्ग पुन्हा सुरू केला आहे. पर्यायी मार्गावरून हलकी वाहने कुंभार्ली घाटमार्गे येत आहेत.