वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत मांडकी (ता. चिपळूण) येथील अनंत खांबे या शेतकऱ्याने सर्वापुढे आदर्श ठेवला आहे. केवळ वर्षातून येणाऱ्या एका पिकावर समाधानी न राहता मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन, भाजीपाला, फळबाग यांची जोड दिली. यामधून खऱ्या अर्थाने शेतीला उद्योग व्यवसायाचा दर्जा मिळवून दिला आहे. यामध्ये त्यांनी नव्या पिढीलाही सामावून घेतले आहे. वडिलोपार्जित जमीन कसण्याबरोबरच जमिनीत आलेला शेतमाल बाजारात विकण्यापर्यंतची कामे खांबे कुटुंबीय एकत्र करतात. त्यांच्या या एकत्रित कुटुंबात २० सदस्य आहेत. शेतीसाठी त्यांना मनुष्यबळासाठी मोठा उपयोग होतो. बाहेरून मजूर आणावे लागत नाहीत. भातशेती, फळबाग, भाजीपाला, नाचणी शेतीसाठी शासनाच्या माध्यमातून बी-बियाणे, खते याचा शेतीसाठी पुरवठा होतो. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत काजूची ३०० रोपे लावली आहेत. यापूर्वी नारळ लावला असून, त्यासाठी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे.
पॉवरव्हिडरसाठी अनुदान घेतले. वडिलांच्या काळात २० गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस निर्मिती करून त्यामधून जरबेराचे उत्पादन केले आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत ७ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळाले. रत्नागिरी ८ या जातीच्या भाताची तसेच अन्य जातीच्या भाताची लागवड त्यांनी केली आहे. भातशेतीनंतर भाजीपालाची शेतीही केली असून, त्यात वांगी, कलिंगड, चवळी, पावटा, लाल माठ आदींची लागवड केली आहे. ही भाजी सावर्डा, आरवली, वहाळ, खेर्डी, संगमेश्वर, माखजन या बाजारात ते स्वतः विक्री करतात. दोन हजार भाजीच्या जुड्या एकट्या सावर्डे बाजारात विकल्याचे खांबे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बाजारामधील असलेली मागणी लक्षात घेऊन मार्केटिंगचे तंत्र निश्चित केले आहे. लवकर येणारे उत्पादने घेऊन त्याची विक्री तंत्र हे यशश्वी शेतीचे तंत्र आहे. त्यामधून पाच रुपयांची जुडी वीस रुपयांपर्यंत विकली जाऊ शकते. ही सर्व शेती ते सेंद्रिय पद्धतीने करत आहेत.