दुपारी दोन वाजता काऊंटडाऊन सुरू झाले आणि श्रीहरीकोटा येथून चांद्रयान ३ ने उड्डाण केले अन् गोगटे जोगळेकर महाविद्यालयात थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट करून इस्रो आणि भारतीय शास्त्रज्ञांचा जयजयकार केला. चांद्रयान उड्डाणाचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावरून दाखवण्यात आले. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात विद्यार्थी, शिक्षकांसमवेत खगोलप्रेमी रत्नागिरीकर उपस्थित होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल अभ्यासकेंद्रही सुरू आहे. या द्वारे खगोलविषयक विविध कार्यक्रम, खगोल अभ्यासकांचे संमेलन, आकाक्ष निरीक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते.
त्यामुळे आज महाविद्यालयात उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी स्क्रिनची व्यवस्था केली. या वेळी ३५० विद्यार्थी सहभागी झाले. सभागृह अपुरे पडले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती ती चांद्रयानाची भरारी. काऊंटडाउन सुरू झाले आणि सगळ्यांच्याच नजरा पडद्यावर स्थिरावल्या. काही क्षणात चांद्रयान अवकाशाच्या दिशेने झेपावले. हा सगळा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मन लावून पाहत होते. याबाबत गोगटे कॉलेजच्या खगोल अभ्यासकेंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार म्हणाले, बहुचर्चित चांद्रयान मोहीम भारतीय स्वबनावटीची व तंत्रज्ञानाने यशस्वी झाली. ज्या पद्धतीने नियोजन केले होते त्या प्रत्येक टप्प्यावर मोहीम यशस्वी होत आहे.
इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन अमृत महोत्सवी वर्षात ही मोहीम होत असल्याने खूप आनंद होतोय. या मोहिमेच्या निमित्ताने भारताने आत्मनिर्भरतेचे पाऊल टाकले.या वेळी प्रा. विवेक भिडे यांनी प्रास्ताविक दिली. त्यानंतर प्रा. बाबासाहेब सुतार यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे चांद्रयानाची सविस्तर माहिती दिली. र. ए. सोसायटीचे उपकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.

