कोकण रेल्वेमार्गावर अनेक गाड्या धावूनही कोकणी प्रवाशांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. खेड हे मध्यवर्ती स्थानक असल्याने या स्थानकावर खेडसह दापोली, मंडणगड या दोन तालुक्यातील प्रवाशांचा भार आहे. नियमित गाड्यांना होणारी गर्दी आणि काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या वंदे भारत या एक्स्प्रेसव्यतिरिक्त इतर एक्स्प्रेस गाड्याना थांबे न दिल्यामुळे या प्रवाशांच्या भाऊगर्दीत तीन तालुक्यांतील प्रवासी उपेक्षित राहिले आहेत. कोकण रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झालेले नसल्यामुळे अनेकवेळा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे प्रवासी वर्गाला चांगलाच फटका बसतो. त्यासाठी कोरे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर नवीन १५ रेल्वे स्थानके निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे पूर्ण झाले की, कोरेचा प्रवास वेगवान होईल. सध्या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान झाला आहे. मात्र, अनेक एक्स्प्रेस गाड्यांना खेड स्थानकावर थांबे देण्याच्या मागणीला बगल दिली जात असल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. सद्यःस्थितीत गर्दीच्यावेळी रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतो. काहीवेळा प्रवाशांना मालडब्याचा आधार घ्यावा लागतो. गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी यांसह मे महिन्यामध्ये दरवर्षी अनेक जादा गाड्या रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात येतात. मात्र, त्यात बसायला जागा मिळत नाही.
रोहा ते मडगावपर्यंत एकच रेल्वेमार्ग असल्यामुळे उत्सव काळात वेळापत्रक कोलमडते. खेड येथून मुंबई जवळ असल्यामुळे नियमित गाड्यांना गर्दी वाढतच आहे. कोकण रेल्वेमार्ग सुरू झाल्यावर मुंबईकर चाकरमानी कोकणात सहज आणि कमी खर्चात प्रवास करू लागले आहेत. सात एक्स्प्रेसना थांबा आवश्यक खेड, दापोली, मंडणगड या तीन तालुक्यांतील कोकणी प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत कोकणी प्रवाशांची मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. सात एक्स्प्रेस गाड्यांना थांबे, चिपळूण-पनवेल नवीन गाडी यांसारख्या अनेक मागण्याही केल्या आहेत. मात्र, त्यासाठीच्या प्रयत्नांना कोकणी प्रवाशांच्या जनरेट्याची गरज आहे.