शहरातील राजिवडा येथे सुमारे ३१ महिलांची २८ लाख ९८ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या महिलांचे गट तयार करून त्यांच्या नावे वेगवेगळ्या फायनान्स कंपनीतून कर्जावू रक्कम घेतली. ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी, तसेच पुणे येथील जागेच्या कोर्टातील केससाठी वापरतो. मी तुमच्या घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे परत देईन, असे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सौ. फरहत इम्रान वस्ता व इम्रान यासीन वस्ता (दोन्ही रा. राजिवडा नाका) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत सौ. हानिफआ साजित मिरकर (वय ३५, रा. राजिवडा पुलाजवळ) यांच्यासह ३१ जणांनी ही तक्रार दिली आहे. जानेवारी २०२३ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. या दोन्ही संशयितांनी मिरकर यांच्यासह महिलांना एकत्र केले. त्यांचे वेगवेगळे गट तयार केले. यामध्ये फिर्यादीसह १०, तसेच अन्य २१ साक्षीदार यांना वेगवेगळ्या फायनान्स कंपनीत नेले. त्यांच्या नावे कर्ज काढून त्यांची रक्कम त्यांना दिली. ही रक्कम संशयितांनी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी, तसेच पुणे येथील जागेची कोर्टात केस चालू आहे, त्यासाठी पाहिजे.
मी तुमचे पैसे घतलेले आहेत त्यापेक्षा जास्त पैसे देईन, असे आमिष दाखवले; परंतु अद्याप मिरकर, तसेच अन्य साक्षीदारांनी वारंवार तगादा लावूनही ती रक्कम संशयितांनी परत केलेली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मिरकर यांच्यासह साक्षीदारांनी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. तक्रारीवरून दोन्ही संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.