लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी पीफास जहाल विषारी रसायनाचे निर्मिती करीत असल्याचा आरोप होत असून, गेले काही दिवस यामुळे प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीफास या घातक रसायनाच्या उत्पादनाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी स्थानिकांनी कंपनीविरोधात एल्गार पुकारला. या कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या आणि आजुबाजूच्या गावातील जनता संभाव्य प्रदूषणाच्या धोक्याने चिंतेत पडली असून, गुरुवारी या सर्व नागरिकांना एकवटून कंपनी कार्यालयावर धडक दिली. “वाचवा….वाचवा…. निसर्गसंपन्न कोकण वाचवा, मानव जातीच्या मूळावर उठलेल्या कंपनीला टाळे ठोका, बंद करा बंद करा…. घातक रसायन निर्मिती करणे बंद करा…. रासायनिक प्रकल्प बंद करा…’ अशा गगनभेदी घोषणा देत परिसरातील शेकडो ग्रामस्थ गुरुवारी सकाळी लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीवर धडकले. दरम्यान, कंपनीची चौकशी करण्यात येत असून, तोपर्यंत कंपनीला टाळे ठोका, अशी मागणी या संतप्त जनतेने केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक संघटना आणि संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत या कंपनीचे उत्पादन बंद ठेवावे, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडू, असा इशारा खा. हुसेन दलवाई यांनी दिला आहे.
पीफास या घातक रसायनाचे उत्पादन ? – गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीच्या माध्यम ातून पीफास या घातक रसायनाची निर्मिती केली जात असल्याचा आरोप होतो आहे. कंपनीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच कंपनी खुलासा करीत नसल्याने संतापही व्यक्त होत आहे. याविरोधात जनतेच्या मनात असंतोष पसरला असून, त्याचा उद्रेक गुरुवारी पाहायला मिळाला.
स्थानिकांची धडक – गुरुवारी सकाळी ११ वाजता परिसरातील जनता एकवटली आणि ती जोरदार घोषणा देत कंपनीवर धडकली. एक्सल फाटा येथून आंदोलनाला सुरुवार झाली. बंद करा बंद करा, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी बंद करा… अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन जनता उत्स्फूर्तपणे घोषणा देत कंपनीच्या गेटवर येऊन धडकले. तेव्हा पोलिसांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनकर्त्यांना रोखले. आंदोलनामुळे कंपनी परिसरात आधीच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलकांची मागणी – कंपनीच्या गेटवर ग्रामस्थांचा हा मोर्चा धडकताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खा. हुसेन दलवाई यांच्यासह आंदोलकांच्या प्रतिनिधींना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र आम्हा सर्वांना चर्चा करायची आहे. जे काही असेल ते समोरासमोर होईल. शिष्टमंडळ वगैरे काही नाही, जे काही बोलायचे ते खुलेआम बोलायचे आहे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
अनेकजण एकवटले – माजी खा. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, इब्राहीम दलवाई, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, निर्मला जाधव, नगरसेवक साजीद सरगुरोह, सफा गोठे, मिसबाह नाखुदा, मुजुफ्फर सय्यद, सुमती जांभेकर, राजन इंदुलकर, रवीना गुजर, राम रेडीज, सुबोध सावंतदेसाई, सतीश कदम, रामदास घाग, संदीप फडतरे, अॅड. संकेत साळवी, उदय घाग, तुळशीराम पवार, हुसेन ठाकुर, महेश गोवळकर, सचिन चाळके, संजय चाळके, रवींद्र गोवळकर, संदीप मोरे, राजेंद्र आमरे, बशीर मुजावर, सुरेश पार्जरे, दिनेश माटे, लक्ष्मण जाधव, केशव लांबे, रोहिणी चव्हाण, राजेंद्र भुरण, अजित शिंदे, असीम सुर्वे, म धुकर शिंगे, शमिना परकार, राजू आंब्रे, ‘वीणा गावकर, गंगाराम इप्ते, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रामदास घाग, श्रीकांत फडतरे, संजय बुरटे, महेश गोवळकर, मल्हार इंदुलकर, अजीम सुर्वे, चंद्रकांत खोपटकर यांच्यासह अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, जागरुक नागरिक, निसर्गप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
जोरदार निदर्शने – हातात तिरंगा ध्वज घेऊन कंपनीविरोधात गेटवर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. यावेळी संघर्ष समितीचे प्रमुख माजी खा. हुसेन दलवाई यांनी आपली परखड भूमिका सर्वांसमक्ष मांडली. पीफास या घातक रसायनाची निर्मिती या कंपनीकडून होते आहे, असे आरोप होत आहेत. कंपनीने त्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रश्न केवळ कंपनीचा नाही तर अनेक लोकांच्या जीवन मरणाचा आहे. पीफासच्या उत्पादनामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो, त्यामुळे परिसरातील जलसाठे दूषित होऊ शकतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण परिसरातील जनतेच्या आरोग्यावर होऊ शकतो, हा धोका आम्ही पत्करु शकत नाही. त्यामुळे त्याबाबत जे काही दावे केले जात आहेत, आरोप होत आहेत, त्याचे निःसंदिग्ध स्पष्टीकरण कंपनीने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
पोकळ दाव्यांवर विश्वास नाही – आंदोलनकर्त्यांना कंपनीच्यावतीने उत्पादन प्रक्रिया आणि त्याबाबतची माहिती देण्यात आली. कंपनी सर्व नियम पाळते, असा दावा करण्यात आला. मात्र पोकळ दाव्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, अपघाताचे काय?, सुरक्षिततेचे काय? असे अनेक प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले.निर्मिती या कंपनीकडून होतं असल्याचा आरोप लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कंपनीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ काही तरी गडबड आहे. कंपनीची चौकशी होत असेल तर ती चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी आणि चौकशी पूर्ण होईस्तोवर कंपनीचे उत्पादन बंद ठेवावे. एकदा काय तो चौकशी समि तीचा अहवाल येऊ दे. कंपनी हे घातक रसायन उत्पादित करते की नाही याचा फैसला होऊ दे. जनतेच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो असे आरोप होत आहेत. चौकशीतून त्याबाबतचे स्पष्टीकरण मिळू दे, जर काही चुकीचे नसेल तर खुशाल कंपनी चालवा. परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीचे उत्पादन बंद ठेवावे, आताच कंपनीला टाळे ठोकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा उग्र आंदोलन – चौकशी पूर्ण होईस्तोवर कंपनीचे उत्पादन बंद ठेवत असल्याचे लेखी द्या, अशी मागणीदेखील करण्यात आली. कंपनीने दुर्लक्ष केले तर आजच्या पेक्षा अधिक उग्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला असून, आजच्या दिवसापुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

