अनेक वर्षांपासून रखडलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, निकृष्ट गटारे व फूटपाथच्या झालेल्या दुरवस्थेविषयी चिपळूण काँग्रेसने येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. ठेकेदारांशी हातमिळवणी करून वेळकाढू भूमिका राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. येत्या १५ दिवसांत कारभारात सुधारणा न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू व वेळ पडल्यास महामार्ग रोखू, असा इशाराही दिला. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग व तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अचानक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या शाखा अभियंत्यांना धारेवर धरले. महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत किती दिवसात काढली जाईल, असा सवाल केला. याशिवाय गटारांची कामे निकृष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी गटारे कोसळली असून, फूटपाथवर चालणेही कठीण बनले आहे. उड्डाणपुलाचे काम अनेक महिने संथगतीने सुरू आहे.
या कामासाठी यंत्रणा वाढवून तातडीने ते मार्गी लावण्याची मागणी यापूर्वीही केली होती; मात्र त्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. दरवेळी नवीन अधिकारी कार्यालयात थांबवून इतर अधिकारी फिरतीवर निघून जातात. निवेदन दिल्यानंतर मी नवीन आहे. माहिती घेऊन सांगतो, अशी चालढकल करण्यात येते; मात्र यापुढे ही बनवाबनवी आम्ही चालवू देणार नाही. ठोस कार्यवाही झाली नाही तर जनतेला सोबत घेऊन आंदोलन छेडू. महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून केलेल्या सूचनांना ठेकेदारांकडून केराची टोपली दाखवली जाते. हे ठेकेदार अधिकाऱ्यांना दाद देत नसल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांचे व ठेकेदारांचे साटेलोटे असल्यानेच कारवाई होत नाही. निवेदने देऊन त्याचा फरक पडलेला दिसत नाही. आता महामार्गावर आंदोलन करून थेट कृती करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. या वेळी शहराध्यक्ष संतोष सावंत-देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यवाहीकडे लक्ष – अनेक वर्षांपासून रखडलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, निकृष्ट गटारे व फूटपाथच्या झालेल्या दुरवस्थेविषयी चिपळूण काँग्रेसने येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आता संबोधित विभाग काय कार्यवाही करतो, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.