सावकारीच्या विरोधात चिपळूण तालुक्यात मोठी कारवाई सुरू झाली. सावकारीविरोधात जोरदार उठाव झाल्याने चिपळुणातील कारवाईचे सावट गुहागर तालुक्यातील सावकारीवर पडू लागले आहेत. तालुक्यातील अनेक सावकारांचे धाबे दणाणले असून सर्वाधिक कामगार असलेल्या दाभोळ परिसरात सावकारी अधिक असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात सावकारी धंद्याने कहर केला आहे. चिपळूणमध्येही सावकारीचा विळखा मोठा आहे. चिपळूणमध्ये महिना १० ते १५ टक्के व्याजाने पैसे देऊन वसुली केली जात असल्याचे बोलले जात आहे. नडलेला माणूस अडचण दूर करण्यासाठी पैसे घेतो आणि अधिक अडचणीत सापडतो, कर्ज वसुलीसाठी घरात जाऊन धमकी देणे, कोऱ्या बॉण्डपेपरवर, धनादेशावर सह्या घेणे, कर्जदाराला ब्लॅकमेल करणे अशा अनेक घटना घडत आहेत.
चिपळूण तालुक्यात अधिकृत व अनधिकृत सावकारांकडून व्याजी पैसे घेतलेल्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने अशा सावकारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुहागर तालुक्यातही सावकारी मोठ्या प्रमाणात आहे. विशेषकरून दाभोळ परिसरातील कामगारांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत काही जण सावकारी करतात. या परिसरात कामगार, मजूर असल्याने सावकाराच्या जाळ्यात अडकतात. कमी पगारावर असलेल्या सर्वसामान्य कामगारांना कर्ज काढल्याशिवाय पर्याय नसतो.
बँका, पतसंस्था या कर्ज देणाऱ्या असल्या तरी या प्रक्रिया कटकटीच्या असल्याने सर्वसामान्य कामगार खासगी सावकारीच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. काहींना ब्लॅकमेलही केले जाते पैसे परत करण्यास विलंब झाला तर व्याजाला व्याज लावून वसूल करण्यात येतात. यासाठी अनेकदा संबंधित कर्जदाराला धमकावले जाते किंवा अन्य मागनि वेठीस धरले जाते. काहींना ब्लॅकमेलही केले जाते; मात्र अशी प्रकरणे अद्याप बाहेर येत नसल्याने गुहागर तालुक्यात सावकारी करणाऱ्यांचे फावले आहे.