औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनी आणि अपघात हे आता नेहमीचेच झाले आहे. पाच महिन्यापूर्वी याच कंपनीत झालेल्या भीष्म स्फोटामध्ये चार कामगारांचा जीव गेला होता. त्या आधीही या कंपनीत जीवघेणे अपघात झालेले आहे. जीवघेणा अपघात घडल्यावर कामगारांच्या सुरक्षिततेबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. यापुढे अपघात होणार नाही याची खबरदारी घेण्याचा शब्द व्यवस्थापनाकडून दिला जातो. मात्र अपघातांची मालिका काही थांबत नाही.
लोटे औद्योगीक वसाहतीतील घरडा केमिकल्स या कंपनीच्या एका प्लॅन्टमधील ऍसिटिक केमिकल वाहिनीमध्ये बिघाड होऊन गळती झाल्यामुळे विषारी वायू निर्माण होऊन कंपनीतील १७ कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. कामगारांच्या जीवावर बेतणारे वारंवार अपघात होणाऱ्या या कंपनीमध्ये हि घटना पहिल्यांदीच घडली असे नाही.
याआधीही घरडा कंपनीप्रमाणेच एमआयडीसी विभागातील अनेक कंपन्यांमध्ये कामगारांच्या जीवावर बेतणारे अपघात झाले होते. गेल्या वर्षभरात या औद्योगिक वसाहतीत ५ ते ६ मोठ्या दुर्घटना घडल्या असून यामध्ये १५ हुन अधिक कामगारांचा नाहक बळी गेला आहे.
गुरुवारी सायंकाळी उशिरा झालेल्या वायूगळतीच्या दुर्घटनेत दुसऱ्या पाळीमध्ये काम करत असलेले १७ कामगार बाधित झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने त्या कामगारांना त्वरेने चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात दाखल केले. दाखल करण्यात आलेल्या चार कामगारांची प्रकृती चिंताजनक बनली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानांमध्ये कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या दुर्घटना वारंवार घडू लागल्या असल्याने ही औद्योगिक वसाहत कामगारांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालल्याची चर्चा जोर धरत आहे. दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी, कुटुंब पोसण्यासाठी या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार काम करत आहेत. मात्र कधी अपघात होईल आणि कधी जीव जाईल याबाबत काहीच शास्वती राहिली नसल्याने येथील कामगार जीव मुठीत धरून काम करत आहेत.