रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी (12 मार्च) रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. काही क्षण जमिनीला हलका कंप जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) कडून मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप १२ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजून १९ मिनिटांनी नोंदवण्यात आला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी मोजण्यात आली असून तो सौम्य स्वरूपाचा असल्याचे सांगितले जात आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरी परिसरात
भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर आणि रेखांश ७३.४४ पूर्व या स्थानावर होता. हा केंद्रबिंदू रत्नागिरी परिसरात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याचे NCS ने स्पष्ट केले आहे. तीव्रता कमी असल्यामुळे भूकंपाचा प्रभाव मर्यादित राहिला.
नागरिकांमध्ये काही काळ भीती
भूकंपाचा सौम्य धक्का बसताच जिल्ह्यातील काही भागांतील नागरिकांना घरातील वस्तूंना हलका कंप जाणवला. त्यामुळे काही नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर आले. काही ठिकाणी लोकांनी एकमेकांना फोन करून माहिती घेतली.
नुकसान नाही
सुदैवाने या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासनाचे आवाहन
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही संशयास्पद परिस्थिती आढळल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तज्ञांच्या मते २.८ तीव्रतेचा भूकंप साधारणपणे सौम्य मानला जातो आणि त्यातून मोठे नुकसान होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

