जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला असून, मागील महिन्याभरात २८ जनावरांना लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यापैकी एक पाळीव जनावर लम्पीने दगावले आहे. लागण झालेल्या जनावरांमध्ये वासरांचा समावेश अधिक असल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात लम्पीबाधित जनावरे आढळल्यानंतर रत्नागिरीतही काही जनावरांना लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पशुविभाग सतर्क झाला आहे. रत्नागिरी, गुहागर, संगमेश्वर तालुक्यात लागण झालेली जनावरे आढळली होती. तत्पूर्वी मे महिन्यामध्ये पशुविभागाकडून १ लाख ६१ हजार पाळीव जनावरांना लम्पीवरील लस देण्यात आली होती. त्यानंतर जून, जुलै या पावसाळ्यातील दोन महिन्यात रोगांची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती; परंतु ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात बाधित जनावरे आढळू लागली.
रत्नागिरी तालुक्यात लम्पीबाधित वासरू मृत पावले. त्यानंतर सतर्क झालेल्या पशुविभागाने तातडीने मृत जनावरांच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी सुरू केली. पाच किलोमीटर परिसरातील काही संशयित जनावरांचे लसीकरणही करण्यात आले. संगमेश्वर तालुक्यात काही जनावरांना लम्पीची बाधा झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यात एका वासराचा लम्पीने मृत्यू झाल्याची तक्रार शेतकऱ्याने पशुविभागाकडे केली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात ५ तालुक्यांमध्ये ७५२ जनावरांना लम्पीची लागण झाली होती तर ६१ जनावरांचा मृत्यू झाला होता.
मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर – जिल्ह्यात सर्वत्र फिरणाऱ्या मोकाट जनावरांमध्येही लम्पीची लागण झाल्याचे दिसत आहे. संबंधित जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांच्यावर उपचार करणे अशक्य झाले आहे. ही जनावरे ग्रामीण भागात असल्यास ग्रामपंचायतींनी तर शहरी भागात असल्यास पालिकेने त्यांना पकडून कोंडवाड्यात ठेवावीत, अशा सूचना पशुविभागाने दिल्या आहेत.

 
                                    