गुहागर शहरातील तहसील कार्यालयाच्या मागे मोठे मैदान आहे. दरवर्षी २६ जानेवारीला शहरातील सर्व शाळांच्या कवायती आणि पोलिसांची परेड या मैदानामध्ये होतात. वर्षभर क्रिकेट, कबड्डी खेळले जाते. स्थानिक शाळकरी मुले शाळा सुटल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी विविध खेळ खेळण्यासाठी या मैदानावर येतात. अनेक संस्था शहर आणि तालुक्यातील क्रीडा स्पर्धा इथे भरवतात.
गुहागरकरांबरोबरच महापुरुषांच्या खेळाडूंनी विशेष आवाहन केले आहे कि, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकमेव असलेले मैदान केवळ खेळासाठी सुरक्षित करावे. या मैदानावर इतर वाहने उभी करू नयेत तसेच खाऊगल्लीचे स्वरूप देऊ नये, अशी मागणी महापुरुष क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हे मैदान वाचवण्यासाठी तालुकावासीयांनीही महापुरुष क्रीडा मंडळाला मदत करावी, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
१० वर्षांपूर्वी खो-खो ची राज्यस्तरीय स्पर्धा याच मैदानात भरवण्यात आली होती. मात्र हे मैदान आता पर्यटकांसाठी केवळ गाड्या पार्किंगचे ठिकाण बनले आहे. सुरूबनातील दुकानदारांवर कारवाई झाल्याने या दुकानदारांनी दुकाने याच मैदानावर पुन्हा थाटली आहेत. त्यामुळे खेळाडूंना खेळायला मैदानात जागाच शिल्लक राहत नाही. हे मैदान खेळासाठी सुरक्षित राहावे यासाठी महापुरुष मंडळ दरवर्षी त्याची साफसफाई करते. सर्वांना खेळण्यासाठी हे खेळाडू क्रिकेटची खेळपट्टी बांधतात. एका अर्थाने भविष्यात टिकून राहावे यासाठी या मैदानाची निगा राखण्याचे काम महापुरुष मंडळाचे खेळाडू सातत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता करत असतात.
आज या मैदानाची स्थिती बघून महापुरुष मंडळातील खेळाडूंना अत्यंत दुःख होत आहे. हे मैदान वाचावे यासाठी महापुरुष क्रीडा मंडळाने नगरपंचायत गुहागर, तहसीलदार गुहागर यांना पत्रे लिहिली आहेत; मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नाही, अशी खंत महापुरुष मंडळाने व्यक्त केली आहे. महापुरुष मंडळाचे अध्यक्ष संतोष तथा बाबू गुहागरकर, कल्पेश बागकर, प्रवीण रहाटे, मयुरेश कचरेकर, हर्षल बावधनकर, अभिजित गोळे, पराग सावंत या सर्वांनी सांगितले की, पोलिस परेड मैदान सुरक्षित राहावे यासाठी आम्ही क्रीडांगण वाचवा अभियान हाती घेणार आहोत.