मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह येत्या ९ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसेच यावेळी ते शरयू नदीची आरती देखील करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. या सभेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “अयोध्या आणि शिवसेनेचे अनेक वर्षांपासून एक नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाचीही मी पाहणी करणार आहे. अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. आम्ही याकडे राजकारण म्हणून कधी पाहिलं नाही आणि पाहणार देखील नाही”, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेयांनीमहाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या ‘वज्रमुठ’ सभेवर ‘वज्रझूठ’ सभा आहे असं म्हणत जोरदार टीका केली. “सत्तेला हपालेलली खोटारडी लोक एकत्र आली आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध ते करणार का?”, असा सवालही यावेळी त्यांनी केला.