महाराष्ट्राच्या खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजी या खेळातील पदकांची लयलूट शुक्रवारीही कायम राहिली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व एक ब्राँझ अशा एकूण पाच पदकांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या संघाने इंडियन राउंड प्रकारात ओडिशाचा पराभव करून ब्राँझपदक जिंकले. गौरव चांदणे व भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडियन राउंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्णपदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केला.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर तिरंदाजीची स्पर्धा पार पडली. गौरव चांदणे (अमरावती) व भावना सत्यगिरी (पुणे) या जोडीने झारखंडच्या जोडीचा ६-२ (३६-३४, ३७-३४, ३३-३५, ३४-३३) असा पराभव करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राने हे सोनेरी यश संपादन केले. १६ वर्षीय भावना सत्यजित ही रणजीत चामले यांची शिष्या असून, ती आर्चर्स अकादमी, पुणे येथे सराव करते. अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे व प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने हे सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले.
ब्राँझपदकाच्या लढतीत सहज विजय – महाराष्ट्राच्या गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे व पवन जाधव या संघाने तिरंदाजीच्या इंडियन राउंड प्रकारात ब्राँझपदकाची कमाई करीत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत भर घातली, महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्राँझपदकाच्या लढतीत ओडिशा संघाचा ६-० (४८-४५, ५७-४७, ५५-५१) असा धुव्वा उडवला.
आकांक्षा, वैष्णवीचे सुवर्ण यश – सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर जोडीने अग्रमानांकित गुजरातला २-०ने नमवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला विभागातील टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. परेड मैदानाजवळील टेनिस संकुलात झालेल्या या स्पर्धेत आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकरने एकेरीचा प्रत्येकी एक सामना जिंकला. आकांक्षा हिने एकेरीच्या पहिल्या लढतीत झील देसाई या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर् ६-३, ३-६, ६-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्यामुळे महाराष्ट्राला या सामन्यात १-० अशी आघाडी मिळाली. हा विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या महाराष्ट्राच्या वैष्णवी हिने वैदेही चौधरी या आंतरराष्ट्रीय खेळाडूचा ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि महाराष्ट्राच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.