२ ऑक्टोबर महात्मा गांधीं जयंतीचे औचित्य साधून चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरामध्ये महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार शेखर निकम आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
लोटिस्माच्या सभागृहात शनिवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे आमदार श्री. निकम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तर प्रशांत यादव यांच्या हस्ते गांधींच्या पूर्णाकार पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला. या वेळी आमदार श्री. शेखर निकम, श्री. प्रशांत यादव यांच्यासह लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ मूर्तिकार दिवंगत रघुवीर कापडी यांचे नातू सुरेश कापडी, शिल्पकार संदीप ताम्हणकर आदीची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आम. शेखर निकम यांनी काही महत्वाच्या गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांनी खऱ्या अर्थाने धडपड केली. त्यांच्या त्याग करण्याच्या वृत्तीचे आपण अनुकरण केले पाहिजे. महात्मा गांधींचे कार्य लोकांसमोर यायला हवे. लाभ आणि लोभापासून अलिप्त राहून आपण कार्य करायला हवे. गांधींचा आदर्श, साधेपणा, सर्वस्व सोडून देण्याची मानसिकता शिकण्याची गरज आहे. लोटिस्माने ऐतिहासिक वारसा जपण्याचे मोठे पुण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गारही या वेळी निकम यांनी काढले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव कार्यक्रमावेळी म्हणाले कि, गांधी जयंतीच्या निमित्ताने एक चांगले काम आपल्या हातून घडत असून, हे नक्कीच आपले भाग्य आहे. गेल्या १४ वर्षांपासून महात्मा गांधींच्या पुतळ्याची जाणवणारी कमतरता आज या पुतळ्याच्या अनावरणाने पूर्ण झाली. त्यामुळे लोटिस्माच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. सध्याची देशभरातील परिस्थिती पाहता महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सहिष्णूतेची आज गरज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे.
त्याचप्रमाणे लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते, महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल लोटिस्माच्या वतीने प्रशांत यादव यांचा आणि सुरेश कापडी व शिल्पकार संदीप ताम्हणकर यांचा लोकमान्य टिळकांची मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला.