मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून येथील नागरिकांमध्ये खदखद वाढत आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या बैठकीत उड्डाणपुलाचे काम कापसाळपर्यंत होण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला होता. या उड्डाणपुलास निश्चित दिशा मिळण्यासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा केला जाणार आहे. त्याकरिता महायुतीच्या शिष्ठमंडळाची रचना तयार करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचा प्रश्न गाजतो आहे. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. बहादूरशेखनाका येथून सुरू होणारा उड्डाणपूल प्रांत कार्यालयाजवळ संपतो आहे. हा पूल कापसाळ विश्रामगृहापर्यंत पुढे नेण्याची मागणी वारंवार होत आहे; परंतु या मागणीला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच शहरात बैठक झाली होती. हा उड्डाणपूल कापसाळपर्यंत असावा, या मागणीवर सर्वांचे एकमत झाले.
चिपळूण शहर सुरक्षित करावे याकरिता महायुतीने एल्गार पुकारला आहे. या उड्डाणपुलासाठी महायुतीचे आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकार व केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. शहरातील बौद्धवाडीतील नागरिकांनी अंडरपास मागणी केली आहे. शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी कापसाळपर्यंत हा उड्डाणपूल व्हावा याकरिता आक्रमक भूमिका घेत ११० कोटीचे अंदाजपत्रक बनवून राजकीय शक्ती वापरून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे ते सादर केले. यापुढील कालावधीत उड्डाणपुलासंदर्भात पुढील पाठपुरावा व रणनीतीकरिता शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले. यासंदर्भात शनिवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्यासोबत शिष्टमंडळाची अधिकृत बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वबाबींवर चर्चा होऊन मार्ग निघण्याची शक्यता आहे.
शनिवारच्या बैठकीकडे लक्ष – चिपळुणातील उड्डाणपुलासंदर्भात २६ जुलैला सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता – निर्णय घेतला जातो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.