रत्नागिरी पालिकेमध्ये गेली अनेक वर्षे ठेकेदारी पद्धतीने काम करणारे ५५ कर्मचारी आणि पाच कचरा वाहतुकीच्या गाड्या कमी करण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. यामुळे शहरातील कचरा उचलण्याचे आणि वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले आहे. कचऱ्यासाठी नागरिकांना गाडीची वाट बघत बसावे लागते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे शहरवासीयांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. याबाबत पालिकेने तातडीने कार्यवाही करावी आणि लोकांना त्रास होणार नाही, असे नियोजन सोमवारी करावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. रत्नागिरी दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी याबाबत पालकमंत्री सामंत यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. १५) पालिकेच्या अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी पालिकेने आर्थिक भार कमी करण्यासाठी अनेक वर्षे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या या ५५ कामगारांना तडकाफडकी कमी केले, तसेच ५ घंटागाड्याही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये साफसफाई करणे आणि कचरा उचलणे आदी कामांना वेळ लागू लागला. बाजारपेठेतील कचरा तर रात्री उशिरा उचलण्यात येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबून राहावे लागत असे. प्रत्येक वॉर्डमध्येही कचऱ्याच्या गाड्या फिरवतानाही वेळेत बदल झाले आहेत. अनेक ठिकाणी दीड-दोन तास उशिराने गाड्या जात होत्या. त्यामुळे नोकरदारवर्गाचेही कचरा टाकताना हाल होऊ लागले होते. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या या धोरणाबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सोमवारी बैठक घ्या – शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहरप्रमुख बिपिन बंदरकर व माजी नगरसेवकांनी लोकांच्या या भावना पालकमंत्री सामंत यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी पालिका अधिकारी आणि आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. कमी केलेले ५५ कर्मचारी आणि गाड्यांविषयी सोमवारी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. त्यामुळे शहरातील कचराप्रश्नाबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.