महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने बुधवारी रत्नागिरीत निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना बुधवारी आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे आंदोलन रत्नागिरी जिल्हाधिकारी कचेरीबाहेर करण्यात आले. निदर्शनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत करावी.
नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज राज्य सरकारने माफ करावे. पीक विमा योजनेचे कठीण नियम रद्द करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्य खात्यात जमा करावी. अतिवृष्ठीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जुन्या निकषांचा आधार न घेता योग्य व पुरेसा मोबदला द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम म्हणाले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेती, घरे-दारे आणि पशुधन वाहून गेले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. अडचणीत सापडलेल्या या अन्नदात्याला सरकारने तात्काळ मदत करावी.